राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उदयनराजे?

शरद पवार यांचा नवा प्रयोग, बेधडक स्वभावामुळे महाराष्ट्रातील युवावर्गात प्रिय असल्याचा फायदा

प्रकाश राजेघाटगे
सन 2014 ची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने विशेष म्हणावी लागेल.या आधी सर्व निवडणुकी पक्षी पातळीवर लढवल्या गेल्या. पक्षाची ध्येय- धोरणे जनतेसमोर मांडून सर्वच पक्ष निवडणुकीला सामोरे जात होते. निकालानंतर निवडून आलेले सर्व सदस्य सर्वानुमते नेता निवड करत असत किंवा पक्षाच्या अध्यक्षाच्या मताने नवा नेता निवडला जात असे आणि असा नेता सरकारचा प्रमुख म्हणून काम पाहात असे. हा ठरलेला प्रघात होता. पण सोळाव्या लोकसभेच्या दोन वर्षे अगोदर 2012 मध्ये गोव्यातील अधिवेशनात भाजपच्या केंद्रीय मंडळाने गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आणि नंतरचा इतिहास आपणांस माहीतच आहे. 2014 ला बहुमताने निवडून आलेला भाजप 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यापेक्षाही जास्त संख्येने निवडून आला. यात भाजपाचे योग्य निवडणूक नियोजनाबरोबरच एक चेहरा देऊन प्रचार करण्याची नवीन पध्दत चांगलीच यशस्वी झाली हे मान्यच करावे लागेल. तसेच आंध्रप्रदेश व ओडिसा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक चेहरा जनतेसमोर उभा केल्यास नक्कीच फायदा होतो असेच दिसून आले.

महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे कायम कॉंग्रेस विचाराचे सरकार सत्तेवर राहिले आहे. अपवाद 1995 च्या युती शासनाचा. पण 2014 नंतर महाराष्ट्राची सत्ता समीकरणे बदलली. भाजपचे सरकार महाराष्ट्रात आल .आणि आता लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या सहा महिन्यांत काही बदल घडेल असे आता तरी वाटत नाही. पण या घडामोडीत शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व शांत बसेल असे कुणालाही पटणार नाही. आणि त्याचीच प्रचिती चालू लोकसभा निवडणुकीत आली. शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी उमेदवाराची वानवा असताना ऐनवेळी शिवसेनेतून आयात करून अभिनेता अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन निवडूनही आणले. पवारांचा हा छोटा प्रयोग यशस्वीही झाला. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पवार तोच प्रयोग मोठ्या प्रमाणावर करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. आणि यावेळी या प्रयोगाचे अभिनेते असणार आहेत त्यांच्याच पक्षाचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले.

उदयनराजे छञपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत. खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आलेले राजे हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी महाराष्ट्रभर प्रसिध्द आहेत.महाराष्ट्रभर तरुणांमध्ये त्यांची भरपूर क्रेझ आहे. शिरूर लोकसभेमध्ये फक्त एका महिन्यात छत्रपतींची भूमिका सादर करणाऱ्या कलावंतास निवडून दिले, हे पाहता साक्षात शिवछत्रपतींचे वंशजच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला नक्कीच फायदा होईल, असा एक अंदाज पवार यांना वाटत असावा. कारण महाराष्ट्रात असा एक वर्ग आहे जो फक्त छत्रपतींना मत म्हणून राष्ट्रवादीला मतदान करेल आणि त्याप्रमाणे उदयनराजे भोसले यांची वाटचालही त्या दिशेने सुरु झालेली आहे. कधीही सातारा लोकसभेच्या बाहेर पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी न लावणारे उदयनराजे लोकसभा निवडणुकीनंतर कटाक्षाने पक्षाच्या कार्यक्रमाला जात आहेत. नुकतीच त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागालाही भेट दिली.

यावेळी त्यांच्याबरोबर कधीही न दिसणाऱ्या सुप्रिया सुळे होत्या, हे ठळकपणे नमूद करावे लागेल. शिवराज्यभिषेक दिन कार्यक्रमावेळी सहसा राजकीय भाष्य न करणारे उदयनराजें यांनी यावेळी रायगडावरून थेट नरेंद्र मोदीवर टीका केली. यावरून असे दिसते की पवारांनी उदयनराजेंना तसा कानमंत्र दिला असू शकतो. कारण पवार पट्टीचे राजकारणी आहेत. ते एका दगडात तीन- चार पक्षी नक्की मारतात हा इतिहास आहे. उदयनराजेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणताना ते कदाचित अजित पवारांचे पंख कसे छाटले जातील हेही पाहतील. त्याचबरोबर सुप्रिया सुळे पक्षातील हातही मजबूत होतील आणि राष्ट्रवादी विधानसभेला लढवणाऱ्या 65 टक्के जागी शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष असल्याकारणाने तेथेही उदयनराजे नावाची मात्रा नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास पवार यांना असावा. पण येणाऱ्या काळातील घडामोडींवर हा प्रयोग अवलंबून आहे.

उदयनराजे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले तर सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नक्कीच भूकंप येईल. जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदारांबरोबर उदयनराजेंचा छत्तीसचा आकडा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व आमदारांनी लोकसभाचा उमेदवार बदलावा म्हणून पवारांकडे मागणी केली होती. अर्थातच पवारांनी सर्व आमदारांना शांत करून परत एकदा उदयनराजेंनाच उमेदवारी दिली. अजूनही विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे उदयनराजे यांच्याबरोबरचे मनोमिलन तितकेसे यशस्वी झालेले दिसत नाही.

शिवेंद्रराजे यांना या नव्या प्रयोगाची चाहूल लागलेले दिसत असल्यामुळे ते चक्क वेगळाच पर्याय निवडण्याची चर्चाही सुरू आहे. तशा बातम्याही सोशल मिडियात पसरू लागल्या आहेत. पण यावेळी पवार साहेब नक्कीच नवीन मांडणी करणार असे दिसून येते आहे. कारण परवा झालेल्या मुंबईच्या बैठकीत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत युवकांना संधी देऊ, असे सुतोवाच केले आहे. उदयनराजे यांच्या बेधडक स्वभाव आणि पवार यांचे राजकारण यांचा मेळ झाला तरच हा प्रयोग यशस्वी होऊ शकता, असा दावा खासगी चर्चांमधून होऊ लागला आहे.

Ads

1 COMMENT

  1. आता पवार साहेबांचे राजकारण योग्य दिशेने चालले आहे.उदयनराजेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्यास राष्ट्रवादी ला 100%फायदा होऊ शकतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)