फोटोगॅलरी : पावसामुळे मुंबई तुंबली! रस्त्यांना आले तलावाचे रुप

मुंबई – सोमवार सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईमध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचून राहिले आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि उपनगरी लोकल उशीरा धावू लागल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 2, 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील काही ठिकाणी आज आणि मंगळवारी अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्‍यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

आज दुपारी मुंबईमधील पावसाने थोडी उघडीप दिली तरी लोहमार्गांवर पाणी साचल्याने उपनगरी रेल्वे उशीराने धावत होत्या. चेंबूरसारख्या काही भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये घुसले आणि नागरिकांनी मुंबई महापालिकेला दोष द्यायला सुरुवात केली. प्रशासनाने पावसाळ्यातील संभाव्य परिस्थितीवर उपाय योजना केल्या नाहीत, अशी टीका स्थानिकांकडून होत आहे. हिंदमता, परळ, लालबाग, सेनपती बापट मार्ग या ठिकाणी पाणी रस्त्यांवरच साचून राहिले. वडाळामध्येही काही इमारतींच्या परिसरात पाणी साचून राहिले आहे.

सायन आणि माटुंगा दरम्यानचे रेल्वेमार्गही पाण्यामध्ये असल्याने त्यामुळे लोकल उशीरा धावत आहेत. हिंदमाता ते दादर दरम्यान गुडघाभर साचलेल्या पाण्यात खेळण्याचा मनसोक्‍त आनंद मुलांनी घेतला. पाणी उपसून काढेपर्यंत नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेने ट्विटरवरून केली आहे.

मुंबई शहरात किमान 12 ठिकाणी भिंत पडल्याच्या घटना घडल्या. मात्र त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गेल्या 2 दिवसात मुंबईमध्ये 540 मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसातल्या पावसाचा ही दशकभरातील उच्चांकी नोंद आहे, असे महापालिकेचे आयुक्‍त प्रविण परदेशी यांनी सांगितले. वातावरणातील बदल आणि भौगोलिक स्थितीमुळे मुंबईमध्ये पूरसदृश्‍य स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या 50 वर्षात इमारतींच्या बांधकामांच्या प्रमाणात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अपुरी असल्याचेही त्यांनी सांगितले.

लाईन्स स्टेशनजवळ सार्वजनिक कामासाठी उभारलेला बांबूचा चौथरा ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या काही गाड्य रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्या उशीराने धावत होत्या. रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने ठाणे स्थानकामध्ये प्रवासी मोठ्या संख्येने खोळांबून राहिले होते. मुंबईतील संततधान पाऊस आणि रेल्वे वाहतुकीबाबतच्या समस्यांसंदर्भात मंत्री पियुष गोयल हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पश्‍चिम रेल्वेने म्हटले आहे.

पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. दक्षिण मुंबई आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या बाजूच्या उपनगरांचा परिसर जलमय झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)