नगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंववड शाखेतील गैरव्यवहारप्रकरणी तेथील पोलिस पथक नगरमध्ये तळ ठोकून आहे. तर, कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातही नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री बँकेत तळ ठोकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
नगर अर्बन बँकेत तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 22 डिसेंबर 2020 रोजी तत्कालीन शाखाधिकारी, कर्जदार, संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. वेळोवेळी कागदपत्रांची मागणी करून बँकेच्या अधिकार्यांनी कागदपत्रे दिली नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट अर्बन बँकेत दाखल झाले. कादगपत्रांची पडताळणी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बँकेत तळ ठोकून होते.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शाखेतील अपहराच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, अन्य लोकांचा पोलिस शोध घेत आहेत.