दप्तरांचे ओझे तपासण्यासाठी आता राज्यभर मोहीम

शाळांनी योग्य उपाययोजना राबविण्याची गरज : शिक्षण विभाग घेणार अधिकाऱ्यांची बैठक

पुणे – शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे तपासणीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. शाळा स्तरावर दप्तरांचे आझे कमी व्हावे यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेशही शिक्षण विभागाकडून शाळांच्या मुख्याध्यापकांना पुन्हा बजाविण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, खासगी अनुदानित व विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळा आहेत. एकूण शाळांची संख्या 7 हजार 400 पर्यंत आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दप्तरांचे ओझ्याबाबतही केंद्र शासनाने गेल्या वर्षी राज्य शासनाला विशेष निर्देश जारी केले होते. मात्र, राज्य शासनाने याची दखल घेऊन शिक्षण विभागाला अद्याप कोणताही सुधारित आदेशच पाठविलेला नाही. त्यामुळे जुन्या आदेशाप्रमाणेच शिक्षण विभागाकडून गेल्या वर्षी कार्यवाही करण्यात आली आहे.

चालू शैक्षणिक वर्षात दप्तरांचे ओझे तपासणीचे काम सुरू करण्याची आठवण शिक्षण विभागाला झाली आहे. यासाठी लवकरच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सक्त सूचनाही देण्यात येणार आहे. लेखी आदेशही अधिकाऱ्यांना बजाविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकार, गटशिक्षणाधिकारी, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत शाळांनाही सूचना व उपाययोजनांबाबतचे पत्र पाठविण्यात येणार आहे.

दप्तरांच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी शाळास्तरावर सर्वंकष प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. यात कसूर केल्यास शाळेच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालणाऱ्या व नियामक मंडळाने नामनिर्देशित केलेल्या एका संचालकांना व शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या वजनाबाबतचे निकष निश्‍चित करून दिले आहे. यात इयत्ता पहिली व दुसरीसाठी 1.5 किलो, तिसरी ते पाचवीसाठी 2.3 किलो, सहावी व सातवीकरिता 4 किलो, आठवी व नववीसाठी 4.5 किलो, दहावीकरिता 5 किलो याप्रमाणे त्यात समावेश आहे.

शाळांना कडक शब्दांत समज देणार
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे तपासणीसाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके नेमण्यात येणार आहेत. ही पथके नियमितपणे शाळांना अचानक भेटी देणार आहे. या पथकांनी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे अहवाल सादर करण्याचे बंधनही घालण्यात येणार आहे. या संचालक कार्यालायामार्फत हा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. दप्तरांचे ओझे जास्त आढळणाऱ्या शाळांना कडक शब्दांत समज देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालक हारुन अत्तार यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या दप्तरातील पाण्याची बाटली, जास्त पानांच्या वह्या, काही पुस्तके, कंपास यातील अनावश्‍यक साहित्य कमी करण्यासाठी शाळांनी व पालकांनी पुढाकार घेतल्यास दप्तराचे ओझे कमी होऊ शकणार आहे. गेल्या वर्षापासून काही शाळांनी विद्यार्थ्यांची दप्तरे शाळेतच ठेवण्याचे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अशा शाळांचे प्रमाण केवळ 2 टक्‍क्‍यांपर्यंत आढळते. हे प्रमाण आणखी वाढविण्याची आवश्‍यकता असून यासाठी जागृती करावी लागणार आहे.
– हारुन अत्तार प्राथमिक शिक्षण उपसंचालक

सन 2018-19 मधील दप्तर तपासणी अहवाल
एकूण शाळा- 5,030
शाळा तपासणीसाठी अधिकारी – 264
तपासणी केलेल्या शाळांची संख्या – 1,283
दप्तरांचे वजन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या- 13,950
निकषानुसार दप्तरांचे वजन असलेले विद्यार्थी – 13,298 (95.33 टक्‍के)
निकषापेक्षा दप्तरांचे वजन जास्त आढळलेले विद्यार्थी – 652 (4.87 टक्‍के)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)