कठोर निर्णय घेण्यासाठी राजकिय इच्छाशक्तीची गरज – संरक्षणमंत्र्यांचा कॉंग्रेसला टोला

मुंबई – पुलवामा हल्ल्‌यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये घुसून दहशवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन युपीए सरकारने कठोर कारवाई केली असती, तर देशात पुन्हा दहशतवादी हल्ले झाले नसते. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्‍मीर मधील काही भाग वगळला तर देशातल्या इतर कोणत्याही भागात गेल्या पाच वर्षात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. कठोर निर्णय घेण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते, असा टोला संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी कॉंग्रेसला लगावला.
भाजपाच्या दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत संरक्षण मंत्री निर्मला सितारामन बोलत होत्या. शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, प्रवक्‍ते माधव भांडारी, केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते. सैनिकांच्या बलिदानाचे आम्ही राजकारण केलेले नसल्याचे सांगताना निर्मला सितारामन म्हणाल्या, जर 26-11 च्या हल्लयानंतर दहशतवादाला त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर तत्कालीन सरकारने दिले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. पण 2016 मधील उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. आताच्या पुलवामानंतर तर सैन्यदलाने थेट पाक सीमा ओलांडून बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. सैन्यदलांना दहशतवादाविरोधात लढण्याची पूर्ण सूट देण्यासाठी राजकीय इच्छाशक्‍तीची गरज असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी तीच इच्छाशक्‍ती दाखविली आहे. आम्ही बालाकोटचा विषय काढत नाही. पण अनेकदा सभेला जमलेल्या जनतेलाच ते ऐकण्याची इच्छा असते. हे आपण दक्षिण भारतातील सभांमध्ये स्वत: अनुभवले असल्याचेही त्या म्हणाल्या.

कॉंग्रेसने जाहीरनाम्यात लष्कराला अधिकार देणारा आफस्पा कायदा हटवण्याविषयी आश्वासन दिले आहे. त्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना निर्मला सीतारमन म्हणाल्या की, आफस्पाशिवाय लष्कराला जम्मू-काश्‍मीरमध्ये काम करणे अशक्‍य आहे. आफस्पा हटवण्याआधी जम्मू-काश्‍मीरमधल्या स्थानिक पातळीवर राज्य आणि केंद्र सरकारला खूप मोठ्या प्रमाणावर काम करावे लागेल. त्यामुळे आफस्पा कायदा रद्द करणे अशक्‍य आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बालाकोट एअरस्ट्राईकबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याबाबत विचारले असता, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असे पुरावे मागत फिरतात हे ऐकून दु:ख होते. 1971 च्या युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन सरकारचे पूर्ण समर्थन केले होते. भाजपा ज्यावेळी विरोधात होता व देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्या-त्या वेळी भाजपाने पूर्णपणे तत्कालीन सरकारचे समर्थन केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 

फडणवीस सरकारची कामगिरी सर्वोत्तम

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजना राबविली. तसेच जलयुक्त शिवार, सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे, असे सांगतानाच केंद्र व राज्य सरकारने अतिशय सहकार्याने योजना राबविल्या आहेत. अर्थात शेतकऱ्यांसाठी अजून आम्हाला खूप काही करायचे आहे याची जाणीवही आम्हाला असल्याचे निर्मला सितारामन म्हणाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)