पैशाच्या वादातून मित्रानेच केली हत्या

पिंपरी – एच.ए. मैदानावर रविवारी (दि. 20) तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या खुनाचा पिंपरी पोलिसांनी 48 तासांत उलगडा केला असून केवळ अडीच हजार रुपयांसाठी मित्रानेच हा खून केल्याचे उघड झाले आहे. आकाश दिनकर राऊत (वय-23 रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अजय राजेश नागोसे (वय-19) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खूनाच्या तपासासाठी दोन पथकांची नेमणूक करण्यात आली होती. या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला. त्यामध्ये मयतासोबत एक जण खून होण्यापूर्वी फिरत असल्याची बाब समोर आली होती. या फुटेजवरून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. खून केल्यानंतर आरोपी आकाश हा बीड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच आरोपीला बीड येथे जावून अटक करण्यात आल्याचे पवार म्हणाले. मयत अजय आणि आरोपी आकाश यांच्यामध्ये अडीच हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. यावरून त्यांच्यामध्ये सातत्याने भांडणे होत होती. रविवारी रात्री देखील याच कारणावरून भांडण झाले होते.

या भांडणावेळी आरोपी आकाशने अजयच्या डोक्‍यात दगड मारून खून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळल्याची उघड झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक कल्याण पवार हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे, सपोनि. अन्सार शेख, हवालदार हरिदास बोचरे, राजेंद्र भोसले, पोलीस नाईक श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, आदिनाथ सरक आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)