राज्यात उष्णतेची लाट कायम

पुणे – राज्यातली उष्णतेची लाट सोमवारीही कायम होती. अनेक ठिकाणी कमाल तापमान उच्चांकी पातळीवर राहिल्याने नागरिकांची होरपळ झाली. पुण्यातही 43 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांमधील हे सर्वाधिक तापमान आहे. याशिवाय अकोला, परभणी आणि चंद्रपूर येथील तापमानाचा पारा 47.2 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. या शहरांसह राज्यातील अनेक ठिकाणी रविवारी नागरिकांनी सर्वात उष्ण दिवस अनुभवला.

पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार आहे. त्यानंतर बहुतांश भागातील तापमान कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ सुरू झाली होती. कोरडे हवामान आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर दिवसा आणि रात्रीच्या तापमानाने एकदम उसळी घेतली. परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आली आहे. येथे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 3 ते 5 अंशांनी वाढले आहे. किमान तापमानातही वाढ झाली आहे. कोकण विभागातील तापमानही सरासरीच्या पुढे गेले आहे.

पुण्यात तापमान सरासरीच्या तुलनेत 5.1 अंशांनी वाढले असून तो 43 अंशांवर गेला आहे.गेल्या शंभर वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी 1897 मध्ये 30 एप्रिल रोजी शहराचे तापमान हे 43.3 अंश सेल्सियस नोंदविले गेले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात पुणे शहरात सरासरी 38 अंश सेल्सिअस तापमान राहाते. यंदा मात्र हा आकडा 43 पर्यंत पोहोचला आहे. जळगाव, मालेगाव, सोलापूर आदी ठिकाणी 43 ते 44 अंशांवर तापमान आहे. विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ येथे तापमानाचा पारा 45 ते 46 अंशांवर नोंदविला गेला. मराठवाड्यात बीड येथे 45.1 अंश, तर औरंगाबाद येथे 43.6 अंश तापमानाची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)