आमदारकी रद्द करण्याची मागणी
अहमदाबाद -गुजरातमधील आमदार अल्पेश ठाकोर यांच्या विरोधात कॉंग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.
ठाकोर 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. त्या राज्यातील प्रभावी ओबीसी नेते असणाऱ्या ठाकोर यांचे पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाबरोबरचे संबंध ताणले गेले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कॉंग्रेसने ठाकोर समाजाचा अपमान आणि विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारत गुजरात विधानसभेचे सभापती राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे एक अर्ज सादर केला.
ठाकोर आमच्या पक्षात राहिलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यामुळे त्यांची आमदार पदावरून हकालपट्टी करावी, असे साकडे कॉंग्रेसने घातले. त्या अर्जावर त्रिवेदी यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने कॉंग्रेसने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. ठाकोर यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आदेश त्रिपाठींना द्यावा, अशी मागणी पक्षाने न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.