दंतवाडा – छत्तीसगडमध्ये नक्षलीविरोधात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत स्थानिक पोलिसांना मोठे यश आले आहे. दंतवाडा येथे रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या दोन्ही नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे रोख बक्षिस जाहीर करण्यात आलेले होते. तसेच एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
देवा आणि ममाली उर्फ मुई असे ठार झालेल्या नक्षलींची नावे आहेत. हे दोघेजण मालगीर क्षेत्र समितीचे सक्रीय सदस्य होते. याबाबत दंतवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, रायपुरहून 400 कि.मी. अंतरावरील गुमीयापाल गावात रविवारी सकाळी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविले. याप्रसंगी गावातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत गोळीबार केला. या गोळाबारला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारात दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले.
तसेच कोशी नामग एका नक्षली महिलेला अटक करण्यात आली. या कारवाईत 303 रायफलसह स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पल्लव यांनी दिली.