मेलबर्न – भारताच्या जी. साथियन व अँन्थोनी अमलराज या जोडीने ऑस्ट्रेलियन टेबल टेनिस स्पर्धेतील पुरूषांच्या दुहेरीत ब्रॉंझपदकाची कमाई केली. त्यांना उपांत्य फेरीत कोरियाच्या जियोंग युंगसिक व ली सांगसू यांनी 14-12, 11-9, 11-8 असे पराभूत केले. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्यांना ब्रॉंझपदक देण्यात आले.
साथियन व अमलराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या जोंग वूनजी व लिम जोंगहून यांच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता. हा सामना त्यांनी 5-11, 11-6, 14-12, 11-8 असा जिंकला. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिलेच ब्रॉंझपदक आहे. या स्पर्धेतील एकेरीत साथियन व अचंता शरथ कमल हे सहभागी झाले होते. मात्र, त्यांना पात्रता फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता.