खटावमधील 16 गावांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

टेंभूचे पाणी न मिळाल्यास सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी, लढून पाणी मिळविण्याचा निर्धार

मायणी – तालुक्‍यातील कलेढोण, विखळेसह सोळा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी द्यावेच लागेल अन्यथा आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार व सर्व पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली जाईल, असा एकमुखी निर्णय तालुक्‍यातील या सोळा गावांनी घेतला असून तसा ठाम निर्धार विखळे येथील झालेल्या सर्वपक्षीय पाणी परिषदेत करण्यात आला.

कलेढोणसह सोळा गावांना टेंभू योजनेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, यासाठी सोमवारी सर्वपक्षीय मेळावा विखळे (ता. खटाव) येथे आयोजित केला होता. या सर्वपक्षीय मेळाव्यास कलेढोणसह 16 गावांतील व आटपाडी (सांगली) पश्‍चिम उत्तर भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. टेंभू योजना सातारा जिल्ह्यातील असून सातारा जिल्ह्यातून सांगली, सोलापूर जिल्ह्याला पाणी जात आहे.

हे पाणी या दुष्काळग्रस्त भागाला आजपर्यंत मिळाले नाही. शेजारच्या तालुक्‍यात, जिल्ह्यात आरक्षण नसलेल्या भागात हे पाणी जात आहे. या भागातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही, जनावरांसाठी पाणी नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आता रडत बसण्याची वेळ नाही. रडून पाणी कोणी देणार नाही, त्यामुळे लढून पाणी मिळविण्याची वेळ आली आहे, असा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.

पाणी मिळविण्यासाठी आजपर्यंत आपण कमी पडलो आहे. 1974 ते 76 च्या लवादामध्ये 584 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यातील 30 ते 35 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यातील फक्त 3 ते 4 टीएमसी पाण्याची गरज आहे. हे पाणी खटाव तालुक्‍यातील या 16 व माण तालुक्‍यातील 16 गावांना सहज मिळू शकते. त्यामुळे शासनाकडून वर्षातून तीन वेळा देणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य आहे. त्यामुळे हे आमचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे ते कसे द्यायचे हे आता संबंधित शासनकर्त्यांनी ठरवावे, असे या मेळाव्यात ठरविण्यात आले.

या मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे व डॉ. दिलीप येळगावकर, माजी कोकण विभाग आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, पंचायत समिती सदस्या मेघा पुकळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे यांनी पाणी कशाप्रकारे उपलब्ध आहे व आपल्याला कसे मिळविता येईल, याबाबत आपले मनोगत व्यक्त करून आम्ही जनतेबरोबर आहे, हे स्पष्ट केले. तर रघुनाथ देशमुख, साईनाथ निकम, विठ्ठल काटकर, भगवान सानप, किरण जाधव, चंद्रकांत हुलगे, संजीव साळुंखे, सोमनाथ शेटे, अतुल देशमुख, सुदाम घाडगे, रघुनाथ घाडगे, सतीश काटकर, जिजाबा घुटुगडे, रमेश हिंजे, चंद्रकांत पावणे या ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले. परिषदेचे प्रास्ताविक विनोद देशमुख यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)