लोकसभेतील शपथविधीदरम्यान घोषणाबाजी

नवी दिल्ली – लोकसभेतील सदस्यत्वाच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर प्रथमच निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली. त्याला प्रतिपक्षांकडून घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर दिले गेले. सभापतींकडून होत असलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत बराच काळ ही घोषणाबजी सुरुच होती. ही घोषणाबाजी कामकजामध्ये नोंदवली जाऊ नये, अशी सूचना पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली.

भाजपच्या अनेक खासदारांनी शपथ घेतल्यानंतर “भारत माता की जय’ आणि “जय श्रीराम’ची घोषणा दिली. समाजवादी पक्षाचे संबळचे खासदार शफिकूर रेहमन बार्क यंनी “वंदे मातरम’च्या घोषणेला आक्षेप घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्तारुढ पक्षाच्या काही सदस्यांनी त्यांच्या दिलगिरीची मागणी केली. सभापतींनी शपथ घेणाऱ्या सदस्यांना कोणतीही घोषणा न देण्याची सूचना वारंवार केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

भाजपचे अरुण कुमार सागर यांनी दोन वेळा “भारत माता की जय’ची घोषणा दिली. त्यावर राहुल गांधी यांनी खोचकपणे “अजून एकदा’ असे सुचवले. भाजपचे अजय कुमार यांनीही “भारत माता की जय’ची घोषणा दिल्यावर राहुल गांधी यांनी त्यांनाही उद्देशून “अजून एकदा’ असे सुचवले. त्यावर “मी घोषणा देतो, पण तुम्ही ती पूर्ण करा.’ असे राहुल गांधींना सुचवले. कुमार यांनी “जय…’ असे म्हणताच राहुल गांधी यांनी “जय हिंद’ असे म्हणून घोषणा पूर्ण केली. त्यांच्या पाठोपाठ कॉंग्रेसच्या अन्य सदस्यांनीही हीच घोषणा पुन्हा दिली.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी “जय भीम, जय मीम, तकबीर अल्लाहू अकबर, जय हिंद’ अशी घोषणा दिली. द्रमुकच्या सदयांनी पेरियार, कलियांगार, गांधी आणि आंबेडकर यांच्या साक्षीने शपथ घेतली. तर मथुरेतील भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी शपथ घेण्याचा शेवट “राधे राधे’ ने केला. त्यानंतर त्यांनी श्रीकृष्णाच्या स्तुतीचा एक श्‍लोकही म्हटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)