दखल : शहरांचा ‘श्‍वास’ वाहतुकीने कोंडला

-अशोक सुतार

भारतासारख्या विकसनशील देशाला अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागते. वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे प्रश्‍न भारताच्या विकासात अडथळा निर्माण करत आहेत, असे म्हणल्यास वावगे ठरत नाही. कारण रस्ते, रेल्वे, जल व वायू वाहतुकीमुळे वेगात विकास साधला जातो. मात्र, वाहतूक कोंडीमुळे या विकासाला ब्रेक लागून विकासाची गती मंदावते.

देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतात वाहतूक कोंडी असणारी प्रमुख दोन शहरे मुंबई व दिल्ली ही आहेत. जागतिक क्रमवारीत जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली आहे. या यादीनुसार, जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली शहर चौथ्या क्रमांकावर आहे.

ऍपल आणि उबेर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील 56 मोठ्या देशांचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. जगातील विविध देशांमधील मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा किती टक्‍के अधिक वेळ लागतो, हे टॉमटॉम या कंपनीच्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालानुसार, मुंबईमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 65 टक्‍के अधिक वेळ लागतो असे नमूद केले आहे.

दिल्लीमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 58 टक्‍के अधिक वेळ लागतो. यामुळे वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपाययोजना केली होती. देशातील अनेक शहरांत वाहतूक कोंडीचे रौद्ररूप दिसून येत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यावर केंद्र सरकारने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

भारताची आर्थिक राजधानी मुंबईत बाहेरील शहरांतून तसेच राज्यांतून दररोज ये-जा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत त्यामुळे वाहतूक कोंडी वाढलेली दिसत आहे. मुंबईत दुचाकीवर प्रवास करणे म्हणजे नियोजित स्थळी उशिरा पोहोचणे होय, असे समजले जाते. मुंबईत आयआयटी क्षेत्रामुळे सधन असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सधन लोक स्वतःची गाडी प्रवासासाठी वापरतात. तसेच मध्यमवर्गामध्ये दुचाकी वापरण्याचे प्रमाण जास्त आहे.

सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणारे दररोजचे प्रवाशी जास्त असले तरी वैयक्‍तिक गाड्या असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात दिसून येते. वाहतूक कोंडी कमी होण्याचा प्रभावी उपाय म्हणून सार्वजनिक वाहनांचा जास्त वापर करायला हवा, असे पर्यावरण तज्ज्ञ म्हणत असले तरी लक्षात कोण घेतो, अशी परिस्थिती आहे. टॉमटॉम कंपनीने मुंबई शहराचा उल्लेख अभ्यासांती केलेला असून मुंबईची महानगरपालिका व राज्य शासनाने शहरातील वाहतूक कोंडीवर तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन प्रभावी उपाययोजना केली तर भवितव्यात ही समस्या प्रबळ होणार नाही. अन्यथा रस्त्यावरून वाहने नेणे, ही बाब अशक्‍य होईल.

वाहतूक कोंडी करणाऱ्या जगातील शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोलंबियाची राजधानी बोगोटा हे शहर आहे. बोगोटामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अपेक्षेहून 63 टक्‍के अधिक वेळ लागतो. बोगोटामधील वाहतूककोंडीला कंटाळून तेथील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी, या मागणीसाठी आंदोलन केले होते. तसे आंदोलन करण्यासाठी सजग नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाची राजधानी लिमा या शहराचा या यादीमध्ये तिसरा क्रमांक आहे. या शहरामध्ये वाहतूक कोंडीमुळे नियोजित स्थळी पोहचण्यासाठी अपेक्षित वेळेहून 58 टक्‍के अधिक काळ लागतो.

रशियाची राजधानी असलेले मॉस्को हे शहर पाचव्या स्थानावर आहे. वाहतूक कोंडीमुळे मॉस्कोमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 56 टक्‍के जास्त वेळ लागतो. चीनसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशातील एकाही शहराचे नाव जगातील पाच क्रमांकामध्ये नाही. चीनमध्ये वाहनांची संख्या जास्त असली तरी तेथील रस्ते मोठे असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत नाही. लोकांनी सार्वजनिक वाहतूक सेवांचा उपयोग केल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास
मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.