सोची (रशिया) – अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांनी युद्धग्रस्त सिरीयाबाबत राजकीय तोडगा काढण्यास मान्यता दिली आहे. रशियाच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर ही माहिती दिली.
सिरीयामध्ये अमेरिका आणि रशिया हे परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे तेथील राजकीय स्थितीबाबत दोन्ही देशांमध्ये मतभेद होते. मंगळवारी काळ्या समुद्रातील सोची येथील रिसॉर्टमध्ये पुतीन यांच्यात याच मुद्दयावर चर्चा झाली, असल्याचे पॉम्पेओ यांनी सांगितले. सिरीयात युद्ध समाप्तीनंतर सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेसाठी एक समिती स्थापन करावी, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. आपापसातील मतभेदांना सर्वसमावेशक संवादामध्ये बदलण्यात यश आले आहे, ही एक मोठी उपलब्धता असल्याचेही पॉम्पेओ यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा ठराव 2254 ला अनुसरून सिरीयाबाबतच्या राजकीय प्रक्रियेला पुढे नेले जात आहे. मात्र तुर्तास ही प्रक्रिया खंडीत झाली आहे. मात्र आता सामोपचाराने ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाऊ शकेल आणि कोंडी सुटेल, अशी आशाही पॉम्पेओ यांनी व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा 2254 ठराव 2015 साली एकमताने मंजूर झाला होता. या ठरावाद्वारे सिरीयामध्ये संयुक्त राष्ट्राच्या पाठिंब्यावरील राजकीय प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. सिरीयामध्ये गेल्या 8व् वर्षात 3 लाख 70 हजार लोक ठार झाले तर लक्षावधी लोक विस्थापित झाए आहेत. सिरीयामध्ये सरकार स्थापनेबाबतच्या अन्य पर्यायांवरही पुतीन आणि पॉम्पेओ यांच्यात चर्चा झाली.