होमगार्ड दलात येणार आणखी साडेपाच हजार जवान

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांना भक्‍कम साथ देण्यासाठी होमगार्ड दलाने कंबर कसली आहे. या निवडणुका आणि अन्य सणांचा कालावधी लक्षात घेऊन होमगार्ड दलामध्ये आणखी साडेपाच हजार जवानांची भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

राज्याच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. हे वास्तव, असतानाच त्यातुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे बंदोबस्त पुरविताना पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच सार्वजनिक निवडणुका, गणेशोत्सव, नवरात्र, ईद आणि अन्य सणांच्या कालावधीत पोलिसांवर बंदोबस्ताचा अधिकचा ताण येत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने होमगार्डच्या जवानांची मदत घेण्यात येत आहे. मात्र, राज्यभरातील होमगार्डची संख्या जेमतेम असल्याने हा बंदोबस्त देताना त्यांनाही बहुतांशी प्रमाणात मर्यादा येत आहेत. त्यामुळेच होमगार्ड जवानांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाला देण्यात आला होता. त्यामध्ये यश आले असून ही कुमक वाढविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती होमगार्ड दलाचे शहर समादेशक उत्तमराव साळवी यांनी दिली.

होमगार्ड जवानांचे मानधन मिळणार वेळेत
नागरिकांकडून “मान’ मिळत असला तरी बंदोबस्त करून पाच-पाच महिने “धन’ मिळण्याची वाट पाहण्याची वेळ होमगार्ड जवानांवर आली आहे. मात्र, त्यांची ही यातना आता लवकरच संपुष्टात येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या जवानांना बंदोबस्त केल्यानंतर तत्काळ मानधन देण्यात यावे, अशा सूचना मुख्य कार्यालयाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आगामी बंदोबस्तापासूनच करण्यात येणार आहे. या जवानांनी बंदोबस्त केल्यानंतर त्यांना किमान महिनाभरात हे मानधन मिळावे, अशी मागणी होत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)