अन्यथा उपसा करणाऱ्या टाक्‍यांना टाळे ठोकू

वॉर्ड क्रमांक चारमधील महिलांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत दिला इशारा 
उंब्रज –
आम्हाला पाणी द्या नाहीतर संपूर्ण गावाला पाणी उपसा करणाऱ्या टाकीला टाळे ठोकू, असा इशारा येथील वॉर्ड क्रमांक चारमधील नागरिकांनी देत वारंवार मागणी करूनही समस्या न सोडवल्याबद्दल गांधीगिरी करत महिला सरपंच यांना हार घालून सत्कार करण्याचा प्रयत्न मोर्चेकरी महिलांनी केला. याप्रसंगी जयविजय चौक परिसरातील महिलांनी रिकामे हंडे वाजवून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करत ग्रामसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी सरपंच यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी संचालक विकास जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, सतिश जाधव, यासह जयविजय चौक परिसरातील महिला, युवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून उंब्रजमधील वॉर्ड क्रमांक चारमधील जयविजय चौक परिसरात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या भागात काहीवेळा पाणीच येत नाही. ही समस्या या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवल्या होत्या. पण त्यावर ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने वारंवार या कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून रात्री अपरात्री सार्वजनिक नळावर रांगा लावाव्या लागत आहेत.

आमचे हक्काचे नळ कनेक्‍शन असताना आम्ही सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी सर्व कामधंदे सोडून रांगेत उभे रहावे लागत आहे, अशी परिस्थिती आमच्यावर का निर्माण व्हावी असा प्रश्न नागरिकांनी यावेळी केला. तर काही नागरिकांना तुम्हाला ही समस्या सोडवता येत नसेल तर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हंडा-हंडा पाणी आम्हाला सार्वजनिक नळावरून भरुन घरी आणून द्यावे म्हणजे तुम्हाला आमचा त्रास कळेल अशा शब्दात व्यथा मांडल्या. व पाण्याचा प्रश्‍न तात्काळ मिटवावा, अशी मागणी केली.

वॉर्ड क्रमांक चारमधील नागरिक नियमित पाणीपट्टी भरतात. तरीही आमच्याच परिसरात पाणी टंचाई का निर्माण व्हावी याचा खुलासा ग्रामपंचायत प्रशासनाने करावा. सदरची पाणीटंचाई त्वरित दूर न केल्यास संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला टाळे ठोकू, असा इशारा यावेळी सर्व उपस्थित महिला व नागकिरांनी यावेळी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)