पुणे – हुश्‍श…! पाणीकपात टळली

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांना दिलासा


15 जुलैपर्यंत 1,350 एमएलडी पाणी पुरवठा


पाटबंधारे विभागाला दयेचा पाझर


आठवड्यातून एकवेळ पाणी बंद ठेवल्यास सिंचनासाठी पाणी

पुणे – “पुणेकर जास्त पाणी वापरतात’ असा हेका लावून, अगदी महिनाभरापूर्वीपर्यंत पाणीकपातीची भाषा करणारे पाटबंधारे खाते लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर खूपच उदार झाले आहे. यापुढे शहराला 1,350 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पाणी वाटपाच्या बैठकीत घेण्यात आला. यापुढे आता पुणेकरांना दोन वेळा पाणी मिळण्याविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निवडणुकांचे वारे वाहात असतानाच पाटबंधारे विभागाच्या धोरणातील हा बदल चर्चेचा विषय झाला आहे.

पाटबंधारे विभागाने सोमवारी पाणी वाटपाची बैठक बोलवली होती. या बैठकीला पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवले होते; परंतु ते तिकडे गेले नाहीत. मात्र, पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणसाखळीमध्ये उपलब्ध असलेल्या 10.12 टीएमसी पाणीसाठ्याचे 15 जुलैपर्यंत नियोजन जाहीर केले आहे.

उपलब्ध पाणीसाठ्यापैकी 1.23 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर 8. 89 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. पुणे शहराला पिण्यासाठी आणि इतर बिगर सिंचन ग्राहकांसाठी 5.38 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाईल. दौंड नगरपालिका आणि इतर ग्रामपंचायतींना पिण्यासाठी 0.58 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, पिण्यासाठी “डेडस्टॉक’ म्हणून 0.25 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उर्वरीत 2.68 टीएमसी पाणी हे सिंचन अर्थात शेती आणि बिगरसिंचनाचे आवर्तन म्हणून शिल्लक ठेवण्यात येणार आहे. परंतू शेतीसाठीच्या पाण्याची कपात करून केवळ बिगरसिंचनासाठी अर्थात पिण्यासाठी हे पाणी पुढील भागासाठी सोडण्यात येणार आहे. मात्र, पुणे महापालिकेने आठवड्यातून एकवेळ पाणी पुरवठा बंद ठेवल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पाटबंधारे विभागाने सुचविले आहे.

मागीलवर्षी पावसाळा संपल्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला पत्र लिहून पुणे महापालिकेचा वार्षिक पाणी वापर 18 टीएमसीवर पोहोचल्याचे कळवत शहराला 1,150 एमएलडीच पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे कळविले. हे कळवितानाच खडकवासला धरणातून बंद पाइपलाइनमधून पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन पंपांपैकी एक पंप अचानक बंद केला. यामुळे दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. तो तीन दिवस पूर्ववत होऊ शकला नाही.

त्यानंतर महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधत पाटबंधारे विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर यातून तात्पुरती सुटका झाली. मात्र, यानंतर डिसेंबर आणि जानेवारीत याचीच पुनरावृत्ती झाली. अखेर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत “पुणे शहराला पुरेसे पाणी देण्यात येईल,’ असे आश्‍वासन दिले. परंतु, यानंतरही पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण देत तसेच पाणी बिलाच्या थकबाकीचे कारण देत महापालिकेला 1,150 एमएलडीच पाणी देणार असल्याचे पत्र महापालिकेला दिले. मात्र, सोमवारच्या बैठकीत पाटबंधारे विभागाला दयेचा पाझर फुटला आणि त्यांनी पुणे महापालिकेला 15 जुलैपर्यंत 1,350 एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केल्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)