पुणे – दीर्घकालीन उपाययोजनांची गरज : डॉ. म्हैसेकर

पुणे – पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे, वाहतूक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. वाहतूक समस्या ही सर्व शहरांसमोरील मोठी समस्या आहे. पुणे शहर आणि परिसरासाठी तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यावर कृती करण्याची गरज असल्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात प्राधिकरणाची पहिली बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्‍त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्‍त श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्‍त (वाहतूक) पंकज देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, महाराष्ट्र मेट्रो रेलचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, प्राधिकरणाचे सचिव तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार देवरे उपस्थित होते.

महापालिका आयुक्‍त राव म्हणाले, पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असून पुणे महानगरपालिकेने तयार केलेली वाहतूक योजना व हॉकर्स योजना लवकरच लागू होणार आहे. कोणताही एक विभाग संपूर्ण वाहतूक व्यवस्थापन करू शकत नाही, त्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची आवश्‍यकता आहे. शहरात सुरू असणाऱ्या मेट्रो सारख्या वाहतूक प्रकल्पांनी बाधित असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका विशेष प्रयत्नशील आहे. वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याबरोबरच लोकप्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, पुणे शहराची हरवलेली सायकलचे शहर ही ओळख नव्याने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध कामांचा आढावा
या बैठकीत महामेट्रो कॅरिडोर 1 व 2 पुणे मेट्रो लाईन 3 कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. एचसीएमटीआर तसेच रिंग रोडच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या पार्किंग सुविधेवर चर्चा करण्यात आली. ई-वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)