पिंपरी-चिंचवड : श्‍वान निर्बीजीकरणास संस्था मिळेना

693 रुपये प्रति श्‍वान दर : संस्थांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की

पिंपरी – शहरातील श्‍वान निर्बीजीकरणासाठी मागविलेल्या निविदेला संस्थांचा प्रतिसाद न मिळाल्याने हे काम करणाऱ्या संस्थांना एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हे काम आता पुन्हा याच दोन संस्था करणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच संस्थांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी या श्‍वानांच्या निर्बीजीकरणाची उपाययोजना केली जाते. त्याकरिता उदगीर येथील मेसर्स सोसायटी फॉर दि प्रिव्हेन्शन क्रुएल्टी ऍनिमल्स आणि नवी मुंबईतील मेसर्स ऍनिमल असोसिएशन या दोन संस्थांना हे काम देण्यात आले आहे. मात्र, शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या पाहता एकूण चार संस्थांची नेमणूक करण्याची आवश्‍यक्‍ता आहे. या कामासाठी 27 नोव्हेंबर 2018 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या निविदा प्रक्रियेत फक्‍त तीन संस्थांनी अर्ज भरल्याने, त्यामध्ये स्पर्धा होऊ शकली नाही. त्यामुळे याच दोन संस्थांना 11 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

दरम्यान, चार संस्थांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याने पहिले पाकिट उघडण्यात आले. मात्र, तांत्रिक तपासणीमध्ये फक्‍त एकच संस्था पात्र ठरली. त्यामुळे निविदा प्रक्रिया पुन्हा राबविणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन, या कामात खंड पडू नये, याकरिता याच दोन्ही संस्थांना हे काम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही दुसरी मुदतवाढ 4 जून 2019 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पार पडेपर्यंत या दोन्ही संस्थांना दोन मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

भटक्‍या कुत्र्यांची समस्या कायम

शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या आणि श्‍वानदंश हे विषय नेहमीचे कळीचा मुद्दा ठरला आहे. याबाबत महापालिका सर्वसाधारण सभेतही अनेकदा वादळी चर्चा झाली आहे. या विषयावर एकदा सर्वसाधारण सभाच तहकूब करण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आली होती. तरी देखील या विषयाची तीव्रता कमी होत नाही. हे काम खूपच कमी संस्था करत असल्याने, जुन्याच संस्थांना कामासाठी मुदतवाढ दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)