नाणे मावळ पठारावर स्वातंत्र्यानंतरही सुविधांचा ‘दुष्काळ’!

उपेक्षित वळणवाटा : सात पठारांवर पायाभूत सुविधांसाठी सेवाभावी संस्थांचा हातभार


-दिनेश टाकवे

नाणे मावळ – नाणे मावळातील विविध गावांच्या हद्दीत असलेली डोंगर माथ्यावरील रहिवासी स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे पठार, कांबरे (नाणे मावळ) पठार, करंजगाव पठार, पाले पठार, उकसान पठार, कुसवली-कुसूर पठार, कांबरे (आंदर मावळ) पठार व त्याचबरोबर सटवाई वाडी आदी गावांचा समावेश होतो. सात पठारे आणि एक वाडीच्या पायाभूत सुविधांबाबत चिंताजनक परिस्थितीवर दैनिक प्रभातने टाकलेला “प्रकाश’…

पायाभूत सुविधांबरोबरच या भागात सध्या पाण्याचा समस्येने भयानरुप धारण केलेले आहे. या ठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तास-तासभर पाणवठ्यावर ताटकळत बसावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत तीव्र उन्हाळ्यामुळे आटत चालले आहेत. नाणे मावळच्या या पठारांवरील विविध प्रकारचे प्रश्‍न प्रशासनाने सोडवण्यासाठी ठोस पावले टाकली, अशी मागणी नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

सुविधांसाठी सेवाभावी संस्थांचा हातभार

पठारावरील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यांच्या जीवनातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, या उदात्त या हेतूने मावळ तालुक्‍यातील काही सेवाभावी संस्था काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सेवाभावी संस्थांमध्ये देवराई, मावळ विचार मंच, मावळ प्रबोधिनी आदी संस्थांचा समावेश होतो. या संस्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात विकास कामे करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. मागील आठवड्यात मावळ विचार मंचच्या माध्यमातून लोकवर्गणी गोळा करून उकसान पठारावर एका विहिरीचे काम करून नागरिकांसाठी पाण्याची सुविधा निर्माण केली आहे.

…अशी आहे वस्तुस्थिती…

नाणे मावळातील असलेली ही विविध पठारे व तेथील रहिवासी विविध गावांच्या हद्दीत विभागली गेली आहे. परिणामी एक-एका गावाच्या हद्दीत पठारावरील मोजकीच घरे येतात. परिणामी कमी मतदारांसाठी कोणत्याच ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य प्रमाणात दखल घेतली जात नाही. परिणामी पठारावरील नागरिकांचे प्रश्‍न सुटले जात नाहीत.

ग्रामस्थांच्या अपेक्षा…

संपूर्ण डोंगरावरील विविध पठार मिळून जर एक वेगळीच म्हणजेच नाणे मावळ पठार या अनुषंगाने नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे. त्यामाध्यमातून शासकीय निधी उपलब्ध करून त्याचा उपयोग पठारावरील जनतेला होईल, अशा मागणीसाठी ग्रामस्थ आग्रही आहेत.

हाच काय तो दिलासा

आमदार बाळा भेगडे यांच्या माध्यमातून गतवर्षी करंजगाव पठारापर्यंत विजेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील गावांमध्ये वीज पुरवठा करण्याचे काम अद्याप बाकी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून आंदर मावळातून डोंगरवाडीपर्यंत (माऊ) डांबरी रस्ता बनवून तयार केला आहे.

“नाणे मावळातील नाणे पठार ते कुसूर पठार येथील ठिकाणी पूर्ण पठारावर आठ धनगर वाड्या आहेत. या आठही वाड्या आठ ग्रामपंचायतीमध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथील वाड्यांचा विकास खुंटला आहे. शासनाची वीजपुरवठा कोणतीही सुविधा नाही. रस्ता हे एक दळणवळणाचे मोठे साधन आहे. त्याही सुविधेपासून हा भाग वंचित राहिला आहे. तसेच मूळ रस्त्यापासून पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. यामध्ये वयोवृद्ध, लहान मुलं, गरोदर महिला, विद्यार्थी व्यावसायिक यांना मोठी कसरत करावी लागते. तसेच पावसामध्ये निसरड्या वाटेने पायी कसरत करून वाहतूक करावी लागते.
– विठ्ठल शेडगे, दुग्ध व्यावसायिक.

पायवाट अन्‌ जीवघेणा प्रवास…

पठारावर दळणवळणासाठी प्रत्येक पठाराची एक स्वतंत्र पायवाट आहे. पण या वाटेवरचा प्रवास हा जीवघेणा आहे. डोंगरकडा चढून वर जाताना किंवा खाली उतरताना लोकांना जीव मुठीत धरून ठेवावा लागतो. शाळकरी मुले, कामगार यांना बॅग घेऊन, तर दूध व्यावसायिकांना दुधाचे कॅण्ड घेऊन दररोज हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. एका वाडीवरून दुसऱ्या वाडीवर जातानाचा असलेला रस्ता मुरूम-माती, खडी-डबर किंवा डांबरी नाही, तर हा रस्ता केवळ धुळीचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांची रस्त्याची समस्या प्रमुख आहे.

 

“नाणे-आंदर मावळ पठारावर आठ-दहा वाड्या आहेत. यामध्ये 2007-2008 मध्ये देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवकालीन टाक्‍या खोदून दिल्या आहेत. परंतु सध्या पावसामुळे गाळ जाऊन पाणी खराब झाले आहे. ग्रामपंचायतींना कळवले असले तरी ग्रामपंचायत लक्ष देत नाही. या भागात रस्ता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, अंत्यविधीसाठी स्मशानभूमी निवारा शेड नाही. तरी शासनाने या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे.
– नामदेव शेडगे, संचालक, उकसान विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)