आंबेगावच्या पटलावर वादळापूर्वीची शांतता

– विशाल वर्पे

केंदूर – आंबेगाव तालुक्‍याच्या राजकारणात तीस वर्षे भक्‍कम पाय रोवून तसेच शिरूर तालुक्‍यातील निर्णायक 39 गावांत नेतृत्व करणारे आमदार दिलीप वळसे पाटील यांना शह देण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पुत्र आंबेगाव विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एकतर्फी वाटणारी आंबेगावची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे आंबेगावच्या आखाड्यात सध्या वादळापूर्वीची दिसत आहे.

67 मध्ये आंबेगाव तालुक्‍याने स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांना आमदार केले. यानंतर 1972 मध्ये स्व. किसनराव बानखेले यांनी स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांना पराभूत केले. परंतु पुढे वळसे पाटील यांचे पुत्र दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याने पुढे राजकारणात आले. स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांचा वारसा पुढे चालवत 1990 पासून सलग तीस वर्षे दिलीप वळसे पाटील हे आंबेगावचे कारभारी राहिले आहेत. याच कारकिर्दीत त्यांचे दोन पुतणे आता आंबेगावच्या राजकारणात सक्रिय आहेत. आढळराव पाटील यांनी आंबेगावच्या लाटेवर सलग पंधरा वर्षे खासदारकी मिळविली. परंतु नुकत्याच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांना पराभवाची धूळ चाखायला लावली. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ काबीज करता येत नव्हता. राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आढळरावांना मदत करीत असल्याचा आरोप होत होता. मात्र, तो आरोप पुसून टाकण्यात वळसे पाटील यशस्वी झाले आहेत. मात्र आढळरावांचा पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आढळरावांनाच वळसे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले आहे. त्यांचे पुत्र अक्षय आढळराव पाटील यांनी आंबेगावात गाठीभेठी सुरु केल्या आहेत.

रांजणगावात रोजगार मेळाव्यात वळसे पाटील यांच्याविरोधात अक्षय आढळराव पाटील हेच उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु 2014 च्या निवडणुकीत वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करून पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी 63 हजार मते मिळवली होती. त्यानंतर त्यांनी पाच वर्षांत मतदारसंघ पिंजून काढल्यामुळे 2019 च्या निवडणुकीतही शिवसेनेकडून तेच उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. शिरूरच्या 39 गावांतून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान आढळरावांकडे “यंदा आमच्या 39 गावाला उमेदवारी हवी’ अशी मागणी केली होती. राजाराम बाणखेले शिवसेनेकडून इच्छुक आहेत.

त्यामुळे विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळते, का आढळरावांच्या कुटुंबातील उमेदवाराचा प्रचार करावा लागणार, याची भीती निष्ठावंतांना सतावत आहे. शिवसेनेतील कोणी बंडखोरी करणार का, याकडे लक्ष लागले आहे. बहुजन वंचित विकास आघाडीकडून जनता दल (सेक्‍यूलर) पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे हेच उमेदवार असल्याची माहिती शेवाळे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे आकडे वंचित विकास आघाडीने बिघडवले असल्याने आंबेगावात त्यांचा करिश्‍मा कितपत चालणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी मते मिळविली होती. त्याचा आढळरावांना फटका बसला आहे. दरम्यान, शिवसेनेकडे इच्छुकांची यादी वाढत आहे. ती डोकेदुखी ठरणार आहे.

शिवसेनेत सुप्त इच्छा बळावल्या
आंबेगाव विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण गिरे यांनीही आपली सुप्त इच्छा लपविली नाही. इच्छुकांच्या यादीत मी सर्वात प्रथम आहे, असा पुनरूच्चार केला आहे. तसेच गिरे हे पाच वर्षे सातत्याने लोकांमध्ये सहभागी झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे यांनी शिवसेनेने संधी दिल्यास नक्‍कीच आंबेगाव विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक सुप्तावस्थेत असलेले इच्छुक आता आंबेगावच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)