तलाठ्याच्या सहीशिवाय मिळणार कृषी योजनांचा लाभ

मंचर – जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही नसली तरी चालेल, परंतु त्यासाठी उत्पन्न दाखल्याचे प्रकरण जमा केल्याची डिजीटल पावती जोडावी. तसेच योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्याने सही असलेला सातबारा उतारा व मूळ उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि कृषी सभापती सुजाता पवार यांनी दिली आहे.

कृषी विभाग डिबीटी मार्फत राबवत असलेल्या 13 वेगवेगळया योजनांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (दि. 15) आहे. यासाठी सातबारा उतारा व उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे आवश्‍यक आहेत, परंतु ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर सही करण्यासाठी तलाठी लवकर भेटत नाहीत.

तसेच उत्पन्नाचा दाखला अर्ज दिल्यानंतर पंधरा दिवसानंतर मिळतो. त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे घोडेगाव येथे झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत चपटेवाडीचे सरपंच संदीप चपटे, राम फलके या शेतकऱ्यांनी ही अडचण प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.

जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करुन उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व सुजाता पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषद कृषी विभाग राबवत असलेल्या सर्व योजनांसाठी तलाठ्याची सही नसलेला ऑनलाईन सातबारा उतारा व उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रकरण दाखल केल्याची पावती जोडली तरी अर्ज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने स्वीकारले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.