अन्यथा जप्त वाहने, हातगाड्यांचा होणार लिलाव

पुणे – अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेल्या हातगाड्या आणि अन्य साहित्य तसेच माल येत्या 15 दिवसांत दंड भरून सोडवून न्यावा अन्यथा या साहित्याचा लिलाव करण्यात येईल, अशी नोटीस महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने प्रसिद्ध केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख उपायुक्‍त माधव जगताप यांनी ही नोटीस प्रसिद्ध केली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने अतिक्रमणावर कारवाई करण्यात येते. बहुतांशवेळा रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर रित्या व्यवसाय करणारे व्यावसायिक तसेच इमारतींच्या फ्रंट अथवा साईड मार्जिनमध्ये अतिक्रमण करून उभारलेले शेड्‌स आणि व्यावसायिक साहित्य महापालिका जप्त करते. तसेच, विक्रीसाठी ठेवलेला मालही जप्त केला जातो. महापालिकेकडे दंड भरून हा माल सोडवण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे. परंतु, बरेचदा व्यावसायिक हा माल सोडवून नेण्याकडे दुर्लक्ष करतात.

कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला असा हजारो टन माल आणि साहित्य सध्या महापालिकेच्या गोदामात पडून आहे. वर्षानुवर्षे पडून राहिल्याने यातील बऱ्याच वस्तू आणि साहित्य खराबही होत आहे. तसेच हे साहित्य, माल ठेवण्यास जागाही कमी पडू लागली आहे. यापार्श्‍वभूमीवर अतिक्रमण विभागाने नोटीस प्रसिद्ध केली आहे. येत्या 15 दिवसांत अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य आणि माल सोडवून न नेल्यास त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे नोटीसद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)