केवळ अद्‌भुत अन्‌ अविश्‍वसनीय ! (अग्रलेख)

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात 23 मे 2019 हा दिवस भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना मिळालेल्या घवघवीत यशामुळे अनेक अर्थाने लक्षणीय ठरला आहे. नरेंद्र मोदी नावाच्या नेत्याने घडवलेला एकहाती चमत्कार हा कोणत्याही राजकीय तज्ज्ञाच्या आकलनाच्या पलीकडचा आहे. वास्तविक आर्थिक क्षेत्रातील कामगिरी, शेतकरी वर्गाचा वाढलेला रोष, बेरोजगार युवक आणि नोकऱ्या गमावून बसलेला कामगार असे सगळे नकारात्मक वातावरण असताना एखादे सरकार पूर्वीपेक्षा चमकदार कामगिरीने पुनरागमन करू शकते काय? याचे उत्तर आज होय, असे आले आहे. त्याअर्थाने हा एक लक्षणीय विजय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींना एकूण मतदानाच्या 31 टक्‍के इतकी मते मिळाली होती आणि 69 टक्‍के मते विरोधात होती.

आजही त्या मतदानाच्या टक्‍केवारीत फारसा फरक पडलेला नाही. भाजपच्या मतांच्या टक्‍केवारीत भरघोस वाढ झाली आहे असेही घडलेले नाही. पण तरीही भाजपची कामगिरी गेल्या वेळेपेक्षा सरस झाली असेल तो एक अविश्‍वसनीयच विजय म्हणावा लागेल. या विजयाचे फार तांत्रिक विश्‍लेषण करायचा हा दिवस नाही. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे दिलखुलास अभिनंदन करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्या राजकीय व्यवहारचातुर्याचे आणि चाणाक्ष इलेक्‍शन मॅनेजमेंटचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. या विजयात मोदींइतकेच तोलामोलाचे योगदान पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे आहे. मोदींनी लोकांपुढे आयकॉनची भूमिका यशस्वीपणे वठवली त्याला शहांच्या मायक्रो लेवलच्या मॅनेजमेंटची चपखल साथ मिळाली. भाजपच्या या विजयाचे विश्‍लेषण करताना हे चाणाक्षपणे करण्यात आलेल्या इलेक्‍शन मॅनेजमेंटचेच हे यश आहे हे सहज लक्षात येते. एकही मतदारसंघ त्यांनी ढिला सोडला नाही.

पक्षीय आणि जातीय गणिते लक्षात घेऊन शहांनी प्रत्येक मतदारसंघाचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन केले. या व्यवस्थापन कौशल्याची अनेक उदाहरणे देता येतील. कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी वाटाघाटी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला ही आघाडी करण्यापासून रोखणे आणि त्यांना या राज्यातील सर्व 48 मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार उभे करायला लावून महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीच्या मतांमध्ये फूट घडवून आणण्यामागे हेच व्यवस्थापन तंत्र कारणीभूत होते हे लपून राहिलेले नाही. हेमा मालिनीच्या विरोधात मथुरेत सपना चौधरीला उभे करण्याच्या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर आपल्या पक्षातील भोजपुरी अभिनेत्याला मधे घालून सपना चौधरीचा कॉंग्रेस प्रवेश त्यांनी नुसताच रोखला नाही तर त्यांना भाजप प्रवेश करण्यास उद्युक्‍त केले गेले.

वास्तविक हा काही राजकीय विश्‍लेषणाचा फार मोठा मुद्दा नसला तरी शहांनी किती बारकाईने लक्ष ठेवून ही सारी व्यूहरचना केली त्याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्यांनी बिहारमध्ये पडती भूमिका घेऊन निवडणुकीच्या तीन महिने आधीच संयुक्‍त जनता दल आणि तेथील अन्य पक्षांची निवडणूक आघाडी करणे, शिवसेनेने कितीही शिव्या-शाप दिले तरी त्यांची मनधरणी करून त्यांचे सगळे हट्ट पुरवून महाराष्ट्रात युती कायम करणे ही भाजपची सारी व्यूहरचना त्यांना मोठे यश देऊन गेली आहे. त्याउलट इलेक्‍शन व्यवस्थापनात कॉंग्रेस खूपच कमी पडली. केजरीवालांनी मध्यंतरी एक विधान केले होते ते तंतोतंत खरे ठरले आहे. इतके विरोधी वातावरण असतानाही जर पुन्हा मोदीच विजयी झाले तर त्याला एकटे राहुल गांधी जबाबदार असतील, असे ते म्हणाले होते.

राहुल गांधी आणि त्यांचा कॉंग्रेस पक्ष भाजपशी दोन हात करण्याऐवजी भाजप विरोधकांचेच खच्चीकरण करण्याचे काम करीत आहे, हे त्यांचे म्हणणे खरे होते. कॉंग्रेस उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या विरोधात लढत होती, पश्‍चिम बंगालमध्ये ते ममतांच्या विरोधात लढत होते, दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये ते आम आदमी पक्षाच्या विरोधात लढत होते. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. मोदींच्या विरोधात आजही जी 65-69 टक्‍के मते नोंदवली गेली आहेत त्याचे एकत्रीकरण करणे कॉंग्रेस व अन्य मित्र पक्षांना जमले नाही. जर या पक्षांचे नेते कोलकात्याच्या रॅलीत एकदिलाने उपस्थित राहू शकतात, ते नेते प्रत्यक्षात मैदानावरील लढाईत एकमेकांच्या विरोधात का लढले, याचे कारण कोणालाच कळले नाही. अर्थात याचा सारा दोष एकट्या कॉंग्रेसला किंवा राहुल गांधींना देता येणार नाही.

ममता, मायावती अशा सारख्या नेत्यांच्या मनात पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा होती त्यामुळे त्यांनीही कॉंग्रेसला बरोबर घेण्याची लवचिकता दाखवली नाही. जर त्यांनी ती दाखवली असती तर आज कदाचित चित्र वेगळे दिसले असते, अर्थात आज निकाल जाहीर झाल्यानंतर अशा किंतु-परंतुला फार महत्त्व राहात नाही. कॉंग्रेसच्या पदरी इतकी घोर निराशा कशी पडली हाही एक वेगळ्या सविस्तर विश्‍लेषणाचा विषय आहे. तथापि यातील एक ठळक कारण असे की राहुल गांधी यांनी संपूर्ण निवडणुकीत स्वतःला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्‍ट करण्यात नेहमीच भिड बाळगली. त्यामुळे त्यांच्याकडे दमदार पर्याय म्हणून कोणी पाहिलेच नाही.

अन्य प्रादेशिक पक्ष राजकीय रणनीती म्हणून किंवा आपल्यालाही पंतप्रधानपदाची संधी मिळण्याची शक्‍यता आहे म्हणून राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मान्य करणे शक्‍य नव्हते हे एकवेळ मान्य करता येईल; पण निदान कॉंग्रेसच्या नेत्यांकडून तरी राहुल गांधी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे छातीठोकपणे सांगणे अपेक्षित होते. तेही ते कधी सांगताना दिसले नाहीत. उलट मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानपदाच्या विषयावर आम्ही आग्रही नाही, अन्य पक्षांच्या नेत्याचाही या पदासाठी विचार होऊ शकतो असे विधान केले. त्यातून विरोधकांच्या तंबूतील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसला. लोकांपुढे मोदींशिवाय दुसरा ठोस पर्याय नाही हा संदेश यातून गेला आणि तिथेच मोदींचा विजय पक्‍का झाला.

मायावती, ममता किंवा आणखी शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांकडे बघून राष्ट्रीय पातळीवर कोणी यूपीएला मतदान करण्याची शक्‍यता नव्हती. वास्तविक या टाळता येण्यासारख्या चुका होत्या. त्या विरोधकांनी गांभीर्याने घेतल्या नाहीत. मोदी पडणारच, एनडीए आता कदापि सत्तेत येणे शक्‍य नाही अशाच भ्रमात ते राहिले. अमित शहांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. याचा परिणाम आज लोकांच्या समोर आहे. लोकांमध्ये जागृत केलेली हिंदू अस्मिता, मध्यमवर्गाची मोठी सहानुभूती आणि समोर कोणताही ठोस पर्याय नसणे या साऱ्या बाबी भाजपला अनुकूल ठरल्या आणि दुरापास्त वाटणारी लढाई त्यांनी एकतर्फी यशात परावर्तित केली, त्याबद्दल भाजपचे शिरस्थ नेतृत्व अभिनंदनाला पात्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)