विधानसभा निवडणूकही महायुती म्हणूनच लढणार – शिवसेना, भाजपाचा निर्धार

मुंबई (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीतील अभूतपूर्व यशानंतर शिवसेना-भाजपा युतीचा विश्वास अधिकच दुणावला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणूनच जनतेसमोर जाण्याचा निर्धार दोघांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने विजयाचे दान शिवसेना-भाजप महायुतीच्या पदरात टाकल्यानंतर महायुतीच्या बिनीच्या नेत्यांनी ‘मातोश्री’वर जमून ऐतिहासिक विजय साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना पेढा भरवून विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणूनच जनतेसमोर जाण्याचा निर्धार दोघांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत लोकांनी भाजपच्या बाजूने जनादेश दिला आहे. देशात सगवीकडे भाजप आणि महायुती जिंकली आहे. निवडणुकीत आमच्या जागा वाढतील असा सुरूवातीपासून आम्हाला आत्मविश्वास होता. वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला फायदा झालेला नाही. कॉंग्रेसने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम किंवा मतविभाजनावर फोडण्याऐवजी आत्मपरिक्षण करावे. आता महायुती म्हणूनच आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पत्रकारांनी युतीत मोठा भाऊ कोण? या पत्रकारांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी हजरजबाबीपणे उत्तर दिले. उध्दवजी हे माझे मोठे भाऊ आहेत आणि उध्दवजींचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी आहेत, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंर्त्यांच्या या उत्तरावर पत्रकार परिषदेत खसखस पिकली.

युती है तो मुमकीन है…
पराभवाने आम्ही खचून जात नाही किंवा विजयाचा उन्माद आमच्या डोक्‍यात नाही. जे विजयी झाले त्या सर्वांचे अभिनंदन. युती है तो मुमकीन है, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. एनडीएच्या आजच्या विजयाबद्दल आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे फोन करून अभिनंदन केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच लवकरच आपण नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे सांगतानाच महायुती म्हणून आम्ही यापुढे एकत्र निवडणूक लढवू, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीतील विजयाचा पेढा खाण्यासाठी तुम्ही पुन्हा मातोश्रीवर या, असे निमंत्रण पत्रकारांना देऊन ठाकरे यांनी विधानसभेला या विजयाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हीडीओ’ या वाक्‍याची खिल्ली उडवली. शिवसेनेच्या आजच्या विजयावर ठाकरे यांनी ‘लाव रे ते फटाके’ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.