पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी तंत्रज्ञान व दुग्ध व्यवसाय या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 2019 ही ऑनलाइन परीक्षा 2 मे पासून सुरूवात होणार असून, दि. 13 मेपर्यंत ही परीक्षा असणार आहे. पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धत वापरली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात थोडीशी धाकधुक आहे.
प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (राज्य सीईटी सेल) ही परीक्षा राबविली जात आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये संगणक व अन्य सुविधांच्या उपलब्धतेनुसार 166 परीक्षा केंद्रावर होणार आहे. जवळपास 12 दिवसांत आणि दोन सत्रांत ही परीक्षा राज्यभरात होत आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असून, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था करण्यात आली आहे.
एमएचटी-सीईटी या परीक्षेसाठी राज्यातील व राज्याबाहेरील एकूण 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थी बसणार आहेत. विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही बदल, दुरुस्ती असल्यास त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांने हमीपत्र परीक्षा केंद्रावर सादर केल्यास परीक्षेस बसण्यास अडचण निर्माण होणार नसल्याचे प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हॉलतिकीट डाऊनलोड करा
एमएचटी-सीईटी परीक्षेची हॉलतिकीट संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग-इनमध्ये आवश्यक सूचनांसह यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीही काही विद्यार्थ्यांनी या सीईटी परीक्षेचे हॉलतिकीट अद्याप डाऊनलोड करून घेतलेले नाही. अशा विद्यार्थ्यांनी तत्काळ हॉलतिकीट डाऊनलोड करावे, अशा सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले आहे.