टंचाईत टॅंकरच्या फेऱ्यांवर आता महिलांची नजर

नगर: ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात मोठे घोटाळे होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे गावांमध्ये टॅंकर पोहोचतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक गावात दोन महिलांवर जबाबदारी देण्यात येत आहे. टॅंकरची फेरी आल्याच्या प्रमाणपत्रावर त्यांची स्वाक्षरी असल्याशिवाय देयक अदा केले जाणार नाही, असे निर्देशच राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत.

भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो; मात्र हा पुरवठा करताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्या जात असल्याचे पुढे येत आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅंकरने पाणी होतो की नाही, यावर लक्ष देण्याची पद्धतही आधीच ठरवून देण्यात आली. त्याची आता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार टॅंकर गावात वेळेवर पोहोचतो की नाही, किती फेऱ्या होतात, किती क्षमतेच्या टॅंकरमधून होतात, याकडे लक्ष दिल्यास टॅंकर घोटाळा रोखला जाऊ शकतो. त्यासाठी गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन महिला सदस्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार टॅंकरच्या फेऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे.

प्रत्येक फेरीला टॅंकर चालक वाहनाचे लॉगबुक तसेच प्रमाणपत्रावर त्या दोन महिलांच्या महिलांची स्वाक्षरी घेणार आहे. त्यावर गावात टॅंकर पोहोचल्याची तारीख, वेळ नोंद केली जाईल. महिला सदस्यांची स्वाक्षरी नसल्यास टॅंकरचे देयक अदा केले जाणार नाही. लॉगबुकच्या नोंदीची माहिती प्रत्येक दिवशी पंचायत समिती स्तरावर व्हॉट्‌स ऍपद्वारे पाठवावी लागणार आहे. टॅंकरच्या टाकीच्या क्षमतेसह संपूर्ण माहिती टॅंकरच्या दर्शनी भागात लावली जाणार आहे.


टंचाई कक्षही सतर्क राहणार!
जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षाकडून टॅंकरची जीपीएस प्रणाली अद्ययावत आहे की नाही, हे तपासले जाईल. प्रत्येक टॅंकरवर जीपीएस कार्यरत करण्याचेही बजावण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here