तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

पोलीस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांची कारवाई; चिखली पोलीस ठाण्यातील प्रकार

पिंपरी -चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार चिखलीतील एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना चांगलाच महागात पडला. टाळाटाळ केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त आर. के. पद्‌नाभन यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तर इतर तिघा जणांची तात्काळ बदली केली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलिस कर्मचारी दत्तात्रय माळवदकर आणि राजेंद्र किरवे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहे. त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी शनिवारी रात्री उशिरा निर्गमित केले आहेत. सहाय्यक निरीक्षकासह तिघांना निलंबीत केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 3 पोलिस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात तात्काळ बदली करण्यात आली आहे.

तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तक्रारदारास सौजन्यपुर्ण वागणुक द्या असे आदेश वेळावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी देत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कनिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीसारखे वागतात. अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी सातत्याने टाळाटाळ केली. मुलीच्या कुटूंबाने या प्रकरणी दाद मागण्यासाठी पोलीस आयुक्तालय गाठले. प्रकरणातील तथ्य समोर येताच आयुक्तांनी तिघाजणांना तात्काळ निलंबीत केले आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन (14 वर्ष) मुलीचा विनयभंग झाला होता. त्याबाबतची तक्रार देण्यासाठी पिडीत मुलीचे वडिल अनेकवेळा पोलीस चौकीत गेले. पोलीस चौकीत हजर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.

शेवटी पिडीत मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांची भेट घेवून हकीकत सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन आयुक्‍तांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हालगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्‍तांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबीत केले तर इतर 3 पोलिस कर्मचाऱ्यांची तात्काळ कंट्रोल रूमला बदली केली. पोलीस आयुक्‍तांनी ठोस भूमिका घेवून निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)