श्रीगोंदा तालुक्‍यात सुमारे 62 टक्के मतदान

संग्रहित छायाचित्र....

निवडणूक शाखेची करडी नजर, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त

अर्वाच्य भाषा तरुणांना भोवली

श्रीगोंदा शहरातील मुलींच्या मराठी शाळेतील मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरा पर्यंत मतदान सुरू होते. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यासोबत काही तरुणांनी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेचा वापर केला. पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतले.

बॅंड वाजवून मतदारांचे स्वागत

मतदानासाठी आलेल्या मतदारांचे बॅंड वाजवून स्वागत शहरातील 247 सखी केंद्राव करण्यात आले.सहाय्यक निवडणूक निर्याधिकारी अजय मोरे व तहसीलदार महेंद्र माळी हे स्वतः मतदारांचे स्वागत करत होते. या अनोख्या पद्धती मुळे सखी केंद्रावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

श्रीगोंदा – लोकसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा तालुक्‍यात शांततेत मतदान झाले. तालुक्‍यात एकूण 62 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. मतदार उन्हामुळे सकाळी व संध्याकाळीच घराबाहेर पडले. दुपारी बहुतांश मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत होता. श्रीगोंदा तालुक्‍यात सकाळी मतदानाचा जोर दिसून आला. अकरा वाजेपर्यंत तालुक्‍यात 16.31 टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजता हा आकडा 50 टक्‍क्‍यांवर गेला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

ऊन कमी झाल्यानंतर अनेक भागातील मतदान केंद्रावर मतदारांची रीघ लागली होती. सायंकाळी उशिरापर्यत काही भागात मतदान चालू होते. एकूण श्रीगोंदा तालुक्‍याचे 62 टक्के मतदान झाल्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले. तालुक्‍यातील चार मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता मात्र काही वेळातच तेथील मतदान सुरळीत झाले.
मतदान घडवून आणण्यासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. बबनराव पाचपुते यांनी कुटुंबियांसह काष्टी येथे तर आ. राहुल जगताप यांनी पिंपळगाव पिसा येथे आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रनोती यांनी श्रीगोंद्यात मतदानाचा हक्क बजावला. राजेंद्र नागवडे व नागवडे कुटुंबीयांनी वांगदरी येथे आपले मतदान केले. लोकशाहीचा उत्सव सोशल मीडियावर शिगेला पोहचला होता.शाई लावलेल्या बोटांच्या फोटोने सोशल मीडियाचा जणू ताबाच घेतला होता.

श्रीगोंद्यातून आ. जगताप आघाडीवर राहतील : नागवडे

श्रीगोंदा तालुक्‍यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकसंघ राहिली. दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. तालुक्‍यातून आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना विक्रमी मताधिक्‍क्‍य मिळेल, असा विश्‍वास नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे प्रचार प्रमुख राजेंद्र नागवडे यांनी मतदानानंतर व्यक्त केला. आघाडीचे उमेदवार आ. जगताप यांचा विजय निश्‍चित असून, त्यांच्या विजयात श्रीगोंद्याचे योगदान उल्लेखनीय राहणार आहे. कॉंग्रेस नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून देताना सत्तेसाठी वारंवार पक्षांतरे करणाऱ्यांना या निवडणुकीत जागा दाखवण्याची जबाबदारी पार पाडली आहे. भाजपा-सेनेचे शेतकरी विरोधी धोरण जनतेला उमगले आहे. त्यामुळे आ.जगतापांना तालुक्‍यातून विक्रमी मताधिक्‍य मिळेल असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीगोंद्याच्या लेकीचे इंग्लंडहून येऊन मतदान शहरातील परदेशात असलेल्या तिघांनी मतदानासाठी आपली जन्मभूमी गाठली. याचे सर्वत्रच मोठे कौतुक होत आहे. सप्रे दाम्पत्य ऑस्ट्रेलियावरून आले तर श्रद्धा सोनावळे या इंग्लंड वरून मतदानासाठी श्रीगोंद्यात आल्या. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणे हे एक आद्यकर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)