मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार पांडुरंग बरोरा उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधान भवनात अध्यक्षांकडे सोपविला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे होते.
दरम्यान, पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. पांडुरंग बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार आहेत.