पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ आता पीएमपीएमएल कर्मचारी, सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त सेवकांनाही मिळणार आहे. यासंबंधिच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागामार्फत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, त्यांनाही या योजनेचे सभासदत्त्व मिळावे, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता.
त्यावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या योजनेचे सभासदत्त्व घेतलेल्या पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी पीएमपीएमएलकडे जमा केलेला 6 कोटी रुपये निधी आणि सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त सेवकांनी जमा केलेली वर्गणी चार समान हफ्त्यात महापालिकेकडे जमा करण्यात येणार आहे.
रुग्णालयांसाठी दूध खरेदीस मान्यता
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय आणि डॉ. नायडू रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी दररोज लागणारे दूध शासकीय दूध योजनेतून खरेदी करण्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार गाईच्या दुधाचा एका लिटरचा खर्च 36 रुपये 75 पैसे (वाहतूक खर्चासह) इतका येणार आहे. कमला नेहरू रुग्णालयात दररोज 120 लिटर आणि नायडू रुग्णालयात दररोज 25 लिटर दुधाची मागणी असते. चालु आर्थिक वर्षात दूध खरेदीसाठी 19 लाख 44 हजार 994 रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.