उन्हाच्या तडाख्यापासून डोळ्यांचा करा बचाव

पुणे – उन्हाचा वाढता चटका डोळ्यांना असह्य करत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेतली तर उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:च्या डोळ्यांचा बचाव करू शकतो, असा सल्ला नेत्रतज्ज्ञ देत आहेत.

उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या आजाराबरोबर डोळ्यांचे आजार उद्‌भवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यावर कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, औषधोपचार, आवश्‍यक आहार कसा असावा याबाबत नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. सीमा जगदाळे यांनी सविस्तर माहिती दिली.

असे राखा डोळ्यांचे आरोग्य
स्वत:ची स्वच्छता राखणे, जोरात डोळे न चोळणे, आपले घर आणि कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवणे, एसीमधून थेट येणाऱ्या हवेपासून दूर राहणे, इतरांचे सौंदर्य प्रसाधने तसेच रुमाल, उशी, टॉवेल इत्यादी गोष्टी न वापरणे आणि प्रत्येक वेळी डिस्पोजेबल टिशू पेपरचा वापर करणे, साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे, अतिनील किरणांपासून बचाव होईल असा गॉगल वापरणे त्याच बरोबर स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाताना यूव्ही प्रोटेक्‍टेड गॉगल वापरणे, अशी काळजी घेतल्यास डोळ्यांचे आजार टाळू शकतो.

डोळ्यांच्या ऍलर्जीची कारणे
उन्हाचा वाढता चटका आणि त्यातच मोबाइलचा अतिवापर, कॉम्प्युटर, अस्वच्छ कामाची जागा आणि बदललेली जीवनशैली यामुळे डोळा कोरडा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. धूळ, परफ्यूम, सौंदर्यप्रसाधने, धूर, परागकण, झाडे आणि बुरशी ह्या घटकांमुळे डोळ्यांना ऍलर्जी होऊ शकते.

ओमेगा-3 फॅटी ऍसिड अधिक प्रमाणात असलेले पदार्थ खाण्याने डोळे कोरडे पडणे किंवा डोळे सुजणे यासारख्या व्याधींपासून बचाव करता येतो. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ म्हणजेच दूध, बदाम, हिरव्या भाज्या खाव्यात आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे तितकेच गरजेचे आहे. स्वतःच्या मर्जीने उपचार किंवा औषधे घेणे टाळावे आणि कुठल्याही प्रकारची लक्षणे किंवा गुंतागुंत आढळून आल्यास तातडीने सल्ला घ्यावा.
– डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ


उन्हाळा हा डोळ्यांच्या आजारांचा काळ असतो. डोळे येणे हा सर्वसाधारण आजार असला तरी डोळे कोरडे पडणे, स्टाय (डोळ्याच्या पापण्यांवर लालसर सूज येणे), ऍलर्जी, पिंगेकुला (कर्करोग नसलेली पेशींची अतिरिक्त वाढ), टेरीगिअम (डोळ्यात निर्माण झालेली पेशींची गुलाबी व त्रिकोणी आकारातील वाढ) यासारख्या रोगांना देखील सामोरे जावे लागते.
– डॉ. सीमा जगदाळे, नेत्रतज्ज्ञ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)