अनंतनागमध्ये सलग दुसऱ्या दिवशी चकमक; एक जवान शहीद
श्रीनगर – दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. ते पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या संघटनेचे सदस्य होते. दरम्यान, चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला.
अनंतनागच्या बिजबेहरा भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्याआधारे सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात सज्जाद बट आणि तौसिफ बट हे दहशतवादी मारले गेले.
फेब्रुवारीत पुलवामामध्ये झालेल्या भयंकर आत्मघाती हल्ल्याच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून सज्जाद सुरक्षा दलांच्या रडारवर होता. त्यामुळे त्याचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठेच यश मानले जात आहे. अनंतनागमध्ये सोमवारीही सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यात लष्कराचा एक मेजर शहीद झाला. त्याशिवाय, एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले. त्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला.