सोशल मीडियावरही आयपीएलचा फिवर!

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे हे 12वे वर्ष आहे. सलग 12 वर्ष आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली अकरा वर्ष केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतात. मुळातच क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे स्थान असलेल्या भारतामध्ये आयपीएल सुरु असल्याने सहभागी संघांच्या फॅन फॉलोअर्सची संख्या देखील खूप मोठी आहे.

आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी संघाचे फॅन मैदानावर गर्दी करताना दिसतात. आयपीएलचा सामना कोणत्याही शहरामध्ये असो क्रिकेट रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे मैदाने नेहमीच तुडुंब भरली असल्याचे चित्र आपण दरवर्षीच पाहतो. मात्र यावर्षी मैदानासोबतच मैदानाबाहेरही आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आजचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे सोशल मीडियाचा वापर न करणारा क्रिकेट चाहता शोधूनही सापडणार नाही.

आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या आठही संघांची स्वतंत्र ट्‌विटर अकाउंट आहेत. प्रत्येक संघाला ट्‌विटरवर लाखो फॉलोअर्स देखील आहेत. हे फॉलोअर्स ट्‌विटरवरुन आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करीत असतात आयपीएलच्या मॅच चालू असताना ट्‌विट्‌सचा अक्षरशः पाऊस पडतो. सेकंदाला हजारो ट्‌विट्‌स येत असतात जो तो आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करणारे ट्‌विट करीत असतो. या सर्वांमध्ये मुंबई इंडियन्सचे ट्‌विटर फॉलोअर्स सर्वात जास्त आहेत. ट्‌विटर प्रमाणेच व्हाट्‌सऍप, फेसबुकच्या माध्यमातूनही चाहते आपल्या संघाला सपोर्ट करीत असतात. आपल्या आवडत्या संघाची मॅच असल्यावर चाहते संघाला सपोर्ट करणारे स्टेट्‌स व्हाट्‌सऍपवर ठेवतात. सध्या सोशल मीडियाचं चित्र पाहायला गेल्यास मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग या दोन संघांना सोशल मिडियावर चाहत्यांचा सर्वात जास्त सपोर्ट मिळत असल्याचे दिसते.

फेसबुकवर देखील कोणता संघ मॅच जिंकणार यावर पैजा लावल्या जातात फेसबुकवर मॅचचा लाईव्ह स्कोर अपडेट करणारे अनेक चाहते आहेत आपला आवडता संघ जिंकल्यास संघाचे अभिनंदन करण्याची चाहत्यांमध्ये स्पर्धा लागते त्याचप्रमाणे पराभूत झालेल्या संघाची खिल्ली उडवणारे मेसेज देखील तत्परतेने पाठवले जातात. हे मेसेज देखील बोलके असतात त्यातून करमणूक तर होतेच पण त्या संघाची सध्यस्थिती काय आहे हे देखील समजते. असाच एक मेसेज माझ्या एका मित्राने मला व्हाट्‌सऍपवर पाठवलेला त्याच झालं असं की विराट कोहलीचा आरसीबी हा संघ पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. हा संघ सलग सहा सामन्यात पराभूत झाला असल्याने सध्या सोशल मीडियावर आरसीबीची खिल्ली उडवली जात आहे. माझ्या मित्राने मला पाठवलेल्या या गमतीशीर मेसेजमध्ये लिहलं होत की “ज्याने आरसीबी विकत घेतली तो आता विचार करीत असेल आरसीबीच्या जागी जेसीबी विकत घेतला असता तर खोदकामात निदान पैसे तरी वसूल झाले असते” असे अनेक मजेशीर मेसेज आयपीएल दरम्यान चाहते व्हायरल करीत असतात यात आपल्या संघाला सपोर्ट करणारे जितके मेसेज असतात तितकेच प्रतिस्पर्धी संघाची खिल्ली उडवणारे मेसेज देखील असतात एकूणच आयपीएलचा हा फिवर सोशल माध्यमांवर देखील चढल्याचे दिसत आहे.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)