नथूराम जिवंत असता तर भाजपाने त्यालाही उमेदवारी दिली असती – सचिन सावंत

मुंबई – प्रज्ञा ठाकूरच्या उमेदवारीचे भाजपाकडून होणारे समर्थन पाहता, नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपाने उमेदवारी दिली असती. इतकेच नाही तर भविष्यात भाजपाने डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी दिली तर आश्‍चर्य वाटायला नको अशी टीका कॉंग्रेस प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

प्रज्ञा ठाकूरवर दहशतवादाचे गंभीर आरोप आहेत. सध्या ती केवळ जामीनावर सुटलेली आहे. तिच्यावर असलेले गुन्हे पाहता एवढ्या मोठ्या आरोपातून सुटका होऊ शकत नाही. दहशतवादाचे गंभीर गुन्हे ज्या व्यक्तीवर आहेत त्याच्या उमेदवारीचे भाजपा निर्लज्जपणे समर्थन करत आहे. शहीद हेमंत करकरे यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत या बाईची मजल गेली. परंतु शहिदांच्या बलिदानावर राजकीय पोळ्या भाजणाऱ्या भाजपाला, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशाची माफी मागावी असे वाटले नाही, असेही सावंत म्हणाले.
प्रज्ञा ठाकूरने केलेली बेताल विधाने पाहता भाजपा तिची हकालपट्टी करेल अशी आशा होती. परंतु भाजपाने तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. यातूनच भाजपा दहशतवादी विचारधारेचे समर्थन करत आहे, हे स्पष्ट दिसून येते असेही सावंत यांनी सांगितले.


माफी मागितल्याशिवाय पापातून मुक्तता नाही
हा केवळ शहीद हेमंत करकरेंचा घोर अपमान नव्हे तर त्यांना देशद्रोही म्हणून प्रज्ञा ठाकूर व भाजपाने देशाचाही अपमान केला आहे. देशभरातून यावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर प्रज्ञा ठाकूरने माफी मागून यातून भाजपा सुटका करुन घेऊ इच्छित आहे. तसेच प्रज्ञा ठाकूरचे ते मत व्यक्तिगत आहे अशी पळवाट काढून भाजपाचे नेते आपले काळे झालेले तोंड झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितल्याशिवाय या पापातून भाजपाची मुक्तता होणार नाही, असे सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)