श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. ती चकमक उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात घडली. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख तातडीने पटली नाही. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी मृत दहशतवाद्याकडील शस्त्रास्त्रे जप्त केली. तिथे मोठ्या प्रमाणात दारूगोळाही आढळला. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटनांना मोठा हादरा बसला आहे.