संडे स्पेशल : वसंताचे गीत…

-अशोक सुतार

थंडीचे दिवस संपले आहेत. शिशिरही कोरडा ठक्क गेला. झाडांची पानगळ सुरू झाली, हळूहळू झाडे ओकीबोकी दिसू लागली. पर्णहीन झाडांमध्येही सौंदर्य अफाट आहे. झाडांच्या नुसत्या फांद्या पाहावयास मिळतात. तुम्ही झाडांकडे किती सौंदर्यदृष्टीने पाहता त्यावर ते अवलंबून आहे. पर्णहीन झाडांचे सौंदर्य केव्हाही न्याहाळावे, चित्रकारांनाही त्याचा मोह होतो. पर्णहीन झाडांचे सकाळी, दुपारी, संध्याकाळी सौंदर्य न्याहाळावे. छायाचित्रकार मंडळींसाठी ती मोठी पर्वणीच म्हटली पाहिजे.

झाडांच्या फांद्यांची मूळ नैसर्गिक रचना, आकारांची गुंतागुंत, त्यातील मोहकता अनुभवली पाहिजे. मानवाची शरीररचना ज्याप्रमाणे चित्रकार रेखाटतात, त्याचप्रमाणे झाडांचे शरीरशास्त्र पाहिले पाहिजे. पानगळ होते, त्यावेळी झाडांच्या आसपास वाळलेली पाने इतस्तत: पहुडलेली असतात. त्या पानांवरून चालत जाण्यात वेगळीच मजा असते. निसर्गातील प्रक्रिया सुरू राहते. वसंत सुरू होतो, तेव्हा झाडे, वेलींना धुमारे फुटायला सुरुवात होते. सृष्टीत अनोखे चैतन्य भरलेले असते. कुसुमाकर वसुंधरेला भेटण्यास उत्सुक असतो आणि वसुंधरा नटूनथटून त्याच्या स्वागताची तयारी करत असते. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू…

पानगळ झाली, आता झाडे कात टाकून पुन्हा बहरणार… झाडांना कोवळी पालवी फुटते, गुलाबी पोपटी पानांचे थवे झाडावर जमा होतात. प्रत्येक फांदीन्‌फांदींवर ते सृष्टीचे अनोखे रूप उधळत असतात. होळीच्या उत्सवात सर्वांनी धमाल केली, निसर्ग तरी कसा मागे राहील ? वसंताच्या आगमनापूर्वी लज्जेने वसुंधरेच्या गालावर लालिमा पसरण्यास सुरुवात होते. जंगलातील पळस बहरतो आणि सुरू होते लाल-केशरी रंगांची उधळण !

पानझडीनंतर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात. मला आठवते, माझ्या लहानपणी आमच्या छोट्याशा गावाबाहेर पळसाची अनेक झाडे असत. आम्ही धुलिवंदनादिवशी कोवळ्या पळस पानाफुलांचा वापर करून तयार झालेला गुलाबी रंग एकमेकांच्या अंगावर उधळण्यासाठी वापरत असू. ते दिवस आता राहिले नाहीत. ती पळसाची झाडेही काळानुरूप नष्ट होऊ लागली आहेत. आता माणसांनी आपल्या जगण्याचे चोचले वाढवून ठेवले आहेत. सिमेंटची जंगले बहरू लागली आहेत. पण त्यात जीव गुदमरतो आणि माणुसकी, आपुलकी एका कोपऱ्यात रडत, कुढत पडलेली असते.

माणसे बदलली पण निसर्गाने निसर्गत्व कायम ठेवले आहे. खरे तर माणसाची निसर्गाशी कधीच तुलना होऊ शकत नाही. निसर्गामुळेच आपण आहोत, याची जाणीव मानवाला झाली तरी पुरे ! वसंत ऋतू म्हणजे निसर्गाने मानवाच्या मनशांतीसाठी अखंड वाहत ठेवलेला चैतन्याचा झरा होय. वसंताच्या आगमनाने, सारी सृष्टी न्हाली फुल अन्‌ पानांनी. कोवळी पाने, सुगंधी फुले आणि झाडावर विसावणारे पक्षी, मला भावते, झाडांच्या विविधाकारांची नक्षी. कुसुमाकर भेटण्या येतो प्रियेला, घेऊन रंग भावनांचे.

सृष्टीत नवे चैतन्य आणि उल्हासाचे वातावरण पसरले आहे. वसंत ऋतूचा काळ म्हणजे कुसुमाकराशी झालेल्या वसुंधरा भेटीचा स्वागत सोहळाच, सृष्टीतील चैतन्याचे नवे पर्वच जणू ! विविध रंग आणि गंधांचे संमेलन जणू भरले आहे आणि तळ्याकाठचे पक्षी किलबिल करीत आहेत. वसुंधरा कुसुमाकराची वाट पाहत आहे. एवढेच नव्हे पानापानांतून सळसळते तारुण्य ओसंडते आहे. दूर मंदिरात घंटांचा नाद किणकिणत आहे. रामजन्मोत्सव साजरा होत आहे.

मंदिराला लागून असलेला औदुंबर जटा सोडून ध्यानस्थ बसला आहे. रामनामाची त्याला गोडी लागली असून ध्यानावस्थेत तो ईश्वररूपाशी एकदत्त झाला आहे. ही सृष्टी सदैव चैतन्याने भरलेली असावी म्हणून निसर्गातील प्रत्येक घटक प्रयत्नरत आहे. वसंताचे गीत घुमाया लागले, पक्ष्यांचे थवे येथे फिराया लागले, प्रेमिकांचे प्रेम बहराया लागले, मनीच्या गुजगोष्टी सांगाया लागले, भावनांचे बंध फुलाया लागले, सृष्टीचे चैतन्य खुलाया लागले. वसंताचे गीत घुमाया लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.