नागपूरच्या अंबाझरी तलाव परिसरात भीषण आग

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध असलेला अंबाझरी तलावाचा बॅक वॉटर परिसरात रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाने मध्यरात्री 2 वाजल्यापासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर पहाटे 5 वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवित आले. या आगीवर वेळेत नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.

अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरापासून हिंगणा एमआयडीसी आणि वाडी परिसराच्या दरम्यान वन विकास महामंडळाची सुमारे 2 हजार एकर एवढी विस्तीर्ण जागा आहे. या मोठ्या परिसरात काही वर्षात नैसर्गिकरित्या झुडपी जंगल वाढले आहे. तसेच राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरु केल्यानंतर तीन वर्षात याच जमिनीवर हजारो रोपटे लावून मानवनिर्मित जंगल निर्माण करण्यात आले होते.
मात्र, काल मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास या परिसरातून आगीचे लोळ उठताना दिसले. स्थानिक नागरिकांनी वन विकास महामंडळासह अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. मात्र, वन विकास महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी 2 तासांपर्यंत पोहोचूच शकले नाही.

अखेर 2 वाजल्यापासून अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले आणि पहाटे 5 वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले. मात्र, तोवर वृक्षारोपण केलेली हजारो रोपटी भस्मसात झाली. शिवाय अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरात वावरणारे शेकडो पक्षी आणि छोटे प्राणी यांचे देखील जीव गेले आहे. दरम्यान, ही आग मानवी चुकांमुळे लागली की जाणूनबुजून घातपात करून लावण्यात आली या बद्दल तर्कवितर्क लावले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)