राजीव कुमार यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस

चिट फंड घोटाळा प्रकणी सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली – कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. यानुसार राजीव कुमार यांना परदेश दौरा करायचा असल्यास विमानतळ प्राधिकरण त्याची माहिती सीबीआयला देणार आहे. 23 मे रोजी त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून ती एका वर्षासाठी वैध असेल. राजीव कुमार हे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

राजीव कुमार यांच्यावर शारदा चिट फंड आणि रोजवेली चिट फंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याविरोधात अधिक तपास करण्यासाठी सीबीआयने राजीव कुमार यांच्या अटकेची मागणी केली होती. परंतु त्यांना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर राजीव कुमार यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्याचा कालावधी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयात त्यांना झटका लागला असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोलकाता उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते.
अटकेपासून संरक्षण मिळाल्याचा कालावधी संपल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशा शक्‍यता आता वर्तवण्यात येत आहे.

तसेच त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरासमोरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सुरक्षा यंत्रणा राजीव कुमार यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये वकीलांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजीव कुमार यांना उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षणाची याचिका दाखल करता आली नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.