निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप; नाना पटोलेंवर गुन्हे दाखल

नागपूर – नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निवडणूक प्रक्रियेत अवाजवी हस्तक्षेप करत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला गुन्हा नाना पटोले यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते प्रशांत पवार आणि कॉंग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह 20 अज्ञात कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मतमोजणीच्या दिवशी थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर जात वाद घातला. या ठिकाणी उमेदवाराशिवाय इतरांना प्रवेश नसतो. तरीही तिथे जाऊन वाद घातला.

कॉंग्रेसच्या निवडणूक प्रतिनिधींना आधीच निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची सर्व माहिती दिल्यानंतर देखील नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसह आत येऊन वाद घातल्यामुळे हे गुन्हे दाखल केले गेले आहे.

दुसरा गुन्हा नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेस नेते अभिजित वंजारी आणि इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांविरोधात दाखल केला आहे. या सर्वांनी निवडणूक अधिकारी व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात कोणती मशीन निवडावी याची प्रक्रिया करताना अवास्तव दबाव आणत मतमोजणीच्या ठिकाणी घोषणाबाजी केली होती.

दरम्यान, नागपूरमधून केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणीत पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.