परशुरामियन्स्‌ फुटबॉल क्‍लब तर्फे निवड चाचणी शिबीराचे आयोजन

पुणे – पुण्यातील नामांकित क्‍लबपैकी एक क्‍लब असलेल्या परशुरामियन्स्‌ फुटबॉल क्‍लब तर्फे निवड चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या 16 वर्षाखालील आणि खुल्या गटासाठीचे हे निवड चाचणी शिबीर 28 ते 31 मे 2019 या कालावधीत सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. हे शिबीर सर्वांसाठी खुले असून मोफत आहे.

या शिबीराबाबत अधिक माहिती देताना परशुरामियन्स्‌ एफसीचे सीईओ परेश पवार यांनी सांगितले की, या वर्षी पहिल्यांदाच परशुरामियन्स्‌ तर्फे निवड चाचणी शिबीराचे आयोजन केले गेले आहे. हे निवड चाचणी शिबीर पुणे शहर आणि परिसरातील खेळाडूंसाठी असून यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 16 वर्षाखालील आणि खुल्या गटातील मुलांच्या शिबीरानंतर 14 वर्षाखालील आणि मुलींच्या खुल्या गटाच्या निवड चाचणी शिबीरही होणार आहे.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) अव्वल श्रेणी गटामध्ये गेल्या बारा वर्षापासून परशुरामियन्स्‌ एफसी संघाचा समावेश आहे. पुण्यातील अव्वल संघांमध्ये परशुरामियन्स्‌ संघाचा समावेश होतो. गेल्या तीन वर्षात संघाने दोन उपविजेतेपद आणि 2018 मध्ये झालेल्या केसरी करंडकाचे विजेतेपद संपादन केले आहे.

परशुरामियन्स्‌ संघाचा रोहन फसगे याने संतोष करंडक 2019 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. पीडीएफएमध्ये परशुरामियन्स्‌ संघाच्या दोन संघाचा समावेश आहे. संघटनेच्या ऍकॅडमीमध्ये सध्या 50 हून अधिक खेळाडू सराव करतात. संघाच्या प्रशिक्षक केंद्रामध्ये अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सप महाविद्यालयावर ही सराव सत्र सुरू असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)