लवकरच होणार उत्तरप्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार

लखनौ – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राज्यातील अनेक विद्यमान मंत्री निवडून आले असून आता त्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार असून काही मंत्र्यांमध्ये खांदेपालटही करण्यात येणार आहे असे सांगण्यात येते. मार्च 2017 मध्ये राज्यात योगी अदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. त्या सरकारचा हा पहिलाच विस्तार असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत चांगली कामगीरी करणाऱ्या नेत्यांना या विस्तारात चांगल्या मंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे असे सांगण्यात येते. त्यात महेंद्रसिंग आणि स्वतंत्रदेवसिंग यांचा समावेश आहे. महेंद्रसिंग यांनी आसामात पक्षाच्या विजयासाठी मोठी कामगीरी बजावली असून त्या राज्यात भाजपला 14 पैकी 9 जागा मिळाल्या आहेत. ते सध्या योगींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पहात आहेत त्यांना कॅबिनेटपदी बढती दिली जाण्याची शक्‍यता आहे.

स्वतंत्रदेव सिंग यांना मध्यप्रदेशात निवडणूकप्रचार प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनीही तेथे चांगली कामगीरी केल्याने पक्षाला 29 पैकी तब्बल 28 जागा जिंकता आल्या आहेत. तेही या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. त्यांनाही कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले जाण्याची शक्‍यता आहे. चार मंत्री राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते.त्यातील तीन जण विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागीही नवीन मंत्री नेमले जाणार आहेत.

उत्तरप्रदेशचे सहकार खात्याचे मंत्री मुकुलबिहारी वर्मा यांचा मात्र या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांना बहुजन समाज पक्षाच्या रितेश पांडे यांनी 95 हजार 880 मतांनी पराभूत केले. उत्तरप्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या दोन महिन्यात होणार आहे. त्या अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)