अबाऊट टर्न : जांभई…

-हिमांशू

क्रिकेटच्या सामन्यात असंख्य रोमहर्षक क्षण येतात. सामना कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत असतो. लाखो प्रेक्षक श्‍वास रोखून बसलेले असतात. कधी अशक्‍य वाटणारा झेल पकडला जातो, तर कधी सोपा झेल सुटतो. एलबीडब्ल्यूचं अपील झाल्यानंतर तिसऱ्या पंचाचा निर्णय येईपर्यंतचा काळ तर खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सहनशीलतेची कसोटी पाहतो. प्रत्येक सामन्यात एखादा विक्रम प्रस्थापित होतो. सबब, सामना संपल्यानंतर ज्यावर चर्चा व्हावी, असे अनेक क्षण क्रिकेटमध्ये अनुभवायला मिळतात.

त्यातच जर सामना भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान असेल, तोसुद्धा विश्‍वचषक स्पर्धेतला… तर मग सामन्याच्या आधीचा आणि नंतरचा आठवडाच अनेकजण चर्चेसाठी बुक करून ठेवतात. आता तर चर्चेसाठी असंख्य माध्यमे उपलब्ध असल्यामुळे सामन्यापूर्वी केलेल्या प्रार्थनांपासूनच धावतं समालोचन सुरू होते. 16 जूनला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात तर अनेक विक्रम झाले. विराट कोहलीच्या 11 हजार धावा पूर्ण झाल्या, रोहित शर्माचे शतक झाले. पण सामन्यानंतर चर्चा रंगली ती एका जांभईची!

प्रेक्षकांची झोप उडवणाऱ्या सामन्यात एखाद्या खेळाडूला जांभया येतातच कशा? हा प्रश्‍न दोन्ही देशांमधल्या क्रिकेटप्रेमींना पडला आणि विचारलाही गेला. जांभया देणारासुद्धा ऐनवेळी क्षेत्ररक्षणासाठी आणलेला बारावा खेळाडू नव्हता, तर चक्‍क पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद होता. छायाचित्रकारांनी मोठ्या कौशल्याने या जांभया टिपल्या व हलकल्लोळ उडाला.

सामान्यतः जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही, तेव्हा दिवसा जांभया येतात. सरफराजने जागरण केले असेल, अशी शंका आम्हाला नाही; पण तणावामुळे कधी-कधी झोप लागत नाही, हेही खरं. सरफराजने नाणेफेक जिंकली तेव्हा त्याच्यावर झोपेचा अंमल होता की नाही, याची आम्हाला कल्पना नाही; पण भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा त्याचा निर्णय चुकला, असं जाणकार म्हणतात.

क्षेत्ररक्षण करताना जांभया देत असलेल्या सरफराजचे फोटो पाहून कुणीतरी त्याला “स्लीप फिल्डर’ असे नाव दिले. एकतर भारत-पाक सामन्यात विजय कुणाचाही होवो; पराभूत संघाला दोन्ही देशांमधले क्रिकेटप्रेमी सोडत नाहीत. या सामन्यानंतरही तेच घडले आणि केंद्रस्थानी राहिली ती सरफराजची जांभई! हा सामना म्हणजे “सर्जिकल स्ट्राइक’च होता, असे वक्तव्य ऐकायला मिळाले, तेव्हा मात्र ही जांभई स्वाभाविक वाटली.

सर्जिकल स्ट्राइक ही सगळेजण साखरझोपेत असताना करण्याची गोष्ट आहे आणि सरफराजसुद्धा झोपेत भारताविरुद्ध सामना जिंकल्याचे स्वप्न रंगवत असावा, असा याचा अर्थ होऊ शकतो का? भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला… एकतर्फी वाटावा इतका! कदाचित त्याच वेळी सरफराजचे स्वप्नभंग आणि झोपमोड झाली असावी. चर्चा करण्याजोगी तीव्र चुरस झालीच नाही आणि चर्चेत आली जांभई!

इंग्लंडचे हवामान फारच लहरी! कधी ढग जमून येतील आणि पाऊस सुरू होईल, सांगता येत नाही. पावसाळी हवेमुळे काहीजणांना उत्साह येतो तर काहीजणांना झोपावंसं वाटते. सरफराजच्या जांभयांचं खरं कारण कळेपर्यंत केवळ चर्चा करणेच आपल्या हाती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)