अग्रलेख : थोरात यांच्यासमोरील आव्हाने

लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसने अखेर पक्ष संघटनेवर लक्ष दिल्याचे दिसते. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली बाळासाहेब थोरात यांची निवड त्याचेच संकेत देत आहेत. प्रदेश कॉंग्रेसच्या समितीत थोरात यांच्या बरोबरीने नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्‍वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्‍ती करण्यात आली असल्याने सामूहिक नेतृत्वावर भर देण्याचा पक्षाचा प्रयत्नही दिसतो आणि सर्व जातींना प्रतिनिधित्व देण्याचा कलही लक्षात येतो.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसची संपूर्ण जबाबदारी एका व्यक्‍तीकडे सोपवण्यापेक्षा समाजातील विविध घटकांनाही निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यावर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसारच पाच कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने विविध समित्यांही जाहीर झाल्या आहेत. अर्थात त्या समित्यांवरील नावे पाहता कॉंग्रेसकडे नवीन नेत्यांची वानवा असल्याचेच स्पष्ट होते. तरीही विधानसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असल्याने कॉंग्रेसने संघटना पातळीवर काहीतरी हालचाल करून कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचा संदेश दिला हेही नसे थोडके.

थोरात यांच्या या निवडीचा आणखी एक पदर आहे, कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आणि 4 वर्षे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद पटकावल्याने त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून कॉंग्रेसने पक्षनिष्ठेचा सन्मान केला आहे. त्याचबरोबर थोरात यांच्यावर मोठी जबाबदारीही टाकली आहे. विखे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधील आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान केले होते. आता राज्यातील पक्षाची धुरा स्वीकारल्यानंतर पक्षातील हे आउटगोइंग थांबवण्याचे मोठे आव्हान थोरात यांना पेलावे लागणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने वेळ कमी आहे, पण या अल्पावधीत राज्यभर दौरे काढून कार्यकर्त्यांमध्ये विश्‍वासाची भावना निर्माण करून चांगले यश मिळवू, असा विश्‍वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्‍त केला असला तरी हे काम किती अवघड आहे याची कल्पना त्यांना असणार आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये पक्षात विश्‍वासाचे वातावरण तयार करण्यावर आपला भर राहणार असून लोकसभेचा निकाल काही लागला तरी विधानसभेत चित्र नक्‍कीच वेगळे असेल, असे थोरात यांनी म्हटले आहे. पण हे विश्‍वासाचे वातावरण तयार करण्यासाठी त्यांना आधी पक्षातील गटबाजी संपवण्याचे काम करावे लागणार आहे.

नगर जिल्ह्यात थोरात आणि विखे या दोन गटांतील स्पर्धेचा फटका पक्षाला कसा बसला याची कल्पना असलेल्या थोरात यांनी राज्यभर ही गटबाजी संपवण्यासाठी आणि एकदिलाने काम करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. पक्षातील गटबाजीला कंटाळूनच नेते आणि कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाची वाट शोधत आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्याकडेच लक्ष द्यावे लागणार आहे. राजधानी मुंबईत मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या गटातील भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले नाही, असा आरोप पराभूत उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.

कॉंग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या विदर्भात पक्षाची अवस्था दयनीय आहे. तेथेही गटबाजींचे ग्रहण आहेच. या ग्रहणातून पक्षाला बाहेर काढण्याचे अवघड काम थोरात यांना करावे लागणार आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असलेली आघाडी सांभाळताना थोरात यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष पश्‍चिम महाराष्ट्रातील आपला प्रभाव कायम ठेवून आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. लोकसभेसाठी या आघाडीला जवळ न केल्याचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसला होता. आता योग्य वेळी योग्य वाटाघाटी करण्याचे चातुर्य आणि तारतम्य थोरात दाखवतील का, हे पाहावे लागेल. कारण या वाटाघाटी करतानाही राष्ट्रवादीचा विचार आणि सहमती त्यांना घ्यावी लागणार आहे आणि पवार यांनी पूर्वीपासूनच प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दुर्लक्ष करून हा चेंडू कॉंग्रेसच्या कोर्टात ढकलला आहे.

साहजिकच थोरात यांनाच हा विषय हाताळावा लागणार आहे. राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्याशी संभाव्य युतीचाही विचार करावा लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयामुळे भाजप आणि शिवसेना यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे आणि त्यांची युती अधिकच घट्ट झाली आहे. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. कॉंग्रेस आघाडी मात्र त्यात मागे आहे. भाजप शिवसेना यांना आव्हान उभे करण्यासाठी थोरात यांच्याकडे फक्‍त दोन महिने आहेत. त्यामुळे रात्रीचा दिवस करून त्यांना आगामी काळात कामाला लागावे लागणार आहे. केंद्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात गोंधळ असल्याने विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या कामासाठी थोरात यांना केंद्रीय पातळीवरील रसद कितपत मिळेल याबाबत शंका आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उपलब्ध असलेली साधनसामग्री वापरूनच त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्‍वास थोरात यांनी व्यक्‍त केला असला तरी हा विश्‍वास प्रत्यक्षात आणणे महाकठीण काम आहे. पण त्या दिशेने पावले टाकण्याचे काम थोरात नक्‍कीच करू शकतात. गेला काही काळ देशात चेहऱ्यांवर निवडणूक लढविल्या जात आहेत, भाजपने त्यात बाजी मारली आहे.

महाराष्ट्र पातळीवर कॉंग्रेसला तसा कोणताही चेहरा नाही, हा चेहरा मिळवून देण्याचे काम थोरात यांना करावे लागणार आहे. सध्यातरी पक्षांतर्गत गटबाजीला पूर्णविराम देणे आणि कार्यकर्त्यांना विश्‍वास देणे ही कामे आगामी काळात थोरात यांनी प्राधान्याने केली तरी राज्यातील कॉंग्रेसची गाडी काही प्रमाणात रुळावर येऊ शकेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)