गिरीश महाजन यांनी वर्तवली शक्यता
नाशिक – राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवली आहे. नाशिकमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणुकीसाठी 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान आचासंहिता लागेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. यापूर्वी पिंपरी येथील एका कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे भाकीत केले होते.
गिरीश महाजन म्हणाले, 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेनूसार मी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी आघाडीतील नेत्यांच्या भाजपप्रवेशाबाबत भाष्य केले. महाजन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक बडे नेते भाजपमध्ये आले. आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पुढच्या बाकावरचे नेते सोडले तर त्यांच्या मागे उभे राहायला कोणीही तयार नाही.
तसेच दोन्ही पक्षांच्या पहिल्या फळीतील अनेक नेते आमच्याकडे येण्यास इच्छूक आहेत. आषाढी एकादशीला जसे वारकऱ्यांचे डोळे विठुरायाकडे लागतात तसे आता सगळ्यांचे (कॉंग्रेस राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांचे) भाजपकडे लक्ष आहे. कारण भारतीय जनता पक्षाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
दरम्यान, महाजन यांनी नवनियुक्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला 50 आमदारांचा आकडा पार करुन दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.