पुणे – शहरातील एका नामवंत सराफीपेढीतून उधारीवर 25 लाखांचे दागिने घेऊन परतफेड न केल्याप्रकरणी अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत “पीएनजी’ ब्रदर्सचे अभय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने व त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने ऊर्फ सायली बालाजी पिसे (रा. त्रिमूती हाऊसिंग सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गाडगीळ यांच्या औंध भागातील पेढीतून काही महिन्यांपूर्वी दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने दागिने, सोन्याचे बिस्कीट, हिरेजडीत अंगठी, चांदीचे दागिने असा 25 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज खरेदी केला होता. त्यावेळी डोबिंवली भागातील जमिनीची विक्री केल्यानंतर उधारीवर घेतलेल्या दागिन्यांची रक्कम परत करेल, असे गाडगीळ यांना सांगितले होते. त्यानंतर दास्ताने यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली, असे गाडगीळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.