पुणे – सराफाची नजर चुकवून 12 तोळ्याचे गंठण चोरणाऱ्यास खडक पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 10 तोळ्याची लगड हस्तगत केली. विनय प्रकाश पावटेकर (39, रा. औरंगाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पूर्वी शहरात सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करत होता.
रविवार पेठेतील लक्ष्मी गोल्ड ऑर्नामेंट येथे 12 फेब्रुवारी रोजी आरोपी गंठण खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने गंठण खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून 12 तोळ्याचे गंठण चोरले. याप्रकरणी सराफ रोहीत बाबर यांनी तक्रार दिली होती.
दरम्यान, पोलीस नाईक सागर केकाण यांना विनय हा शनिवार मारुती मंदिराजवळ आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याने चोरीचे गंठण रविवार पेठेतील एका कारागिराकडून आटवून लगड तयार करून घेतली होती. यातील दहा तोळ्याची लगड हस्तगत केली.
आरोपी पावटेकर हा पूर्वी पुण्यामध्ये सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करत होता. यामुळे त्याची रविवार पेठेतील अनेक नामांकित सराफांबरोबर ओळख आहे. तो बोलण्यात पटाईत असून बोलता बोलता समोरच्या व्यक्तीकडून सोन्याचे दागिने चोरत असल्याचे समजते. यादुष्टीने आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार अजिज बेग, फहिम सय्यद, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, अमय रसाळ, अनिकेत बाबर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, विशाल जाधव, राहुल मोरे, रवी लोखंडे यांच्या पथकाने केली.