क्रिकेटविश्‍वाचा कुंभमेळा (अग्रलेख)

साऱ्या जगातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात असलेली विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. आगामी दीड महिना क्रिकेटविश्‍वाचा हा कुंभमेळा चाहत्यांना मोठा आनंद देणार आहे. अर्थात, या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी कशी होते याचेच जगाच्या पाठीवर पसरलेल्या तमाम भारतीयांना आकर्षण आहे. यापूर्वी 1983 आणि 2011 मध्ये विश्‍वचषक जिंकणारा भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्‍वविजेतेपद मिळवण्याच्या निर्धारानेच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. गेली काही वर्षे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दीर्घकाळ अग्रमानांकित असलेल्या भारतीय संघाकडून जगातील सर्वच चाहत्यांना विजेतेपदाच्या अपेक्षा आहेत. जागतिक क्रिकेटमधील दिग्गजही भारतालाच विजयाची पसंती देत आहेत. कारण भारताचा संघ सध्या सर्वात बलवान वाटत आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे आक्रमक सलामीवीर भारताकडे आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील महत्त्वाची जागा सांभाळण्यासाठी जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली आहे.

सामन्याची दिशा कधीही पालटून टाकण्याची क्षमता या तिघांकडे आहे. त्याशिवाय भारताला 2011 मध्ये विश्‍वचषक जिंकून देणारा यष्टीरक्षक, फलंदाज महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू केदार जाधव, धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या यांच्यामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत भासत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताची गोलंदाजी सर्वोत्तम आहे. भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सांभाळत आहे. याशिवाय मोहम्मद शमी, भुवनेश्‍वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांची साथ त्याला मिळेल. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या तरुण फिरकी गोलंदाजांमुळे भारताची गोलंदाजी वैविध्यपूर्ण झाली आहे. त्याशिवाय केदार जाधव आणि जडेजा वेळ पडल्यास गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतात.

भारताला चिंता असेल तर ती चौथ्या क्रमांकावरील फलंदाजांची. अर्थात बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात शतक ठोकून के. एल. राहुलने ही चिंता काही प्रमाणात कमी केली आहे; पण त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागेल. भारतासाठी अष्टपैलू कामगिरी करण्याची क्षमता हार्दिक पांड्यामध्ये आहे. 1983 च्या स्पर्धेत मोहिंदर अमरनाथने आणि 2011 च्या स्पर्धेत युवराजसिंगने केलेली कामगिरी यावेळी हार्दिक करू शकतो. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरील अष्टपैलू खेळाडू कोणत्याही संघासाठी नेहमीच महत्त्वाचा असतो. स्पर्धेतील इतर संघांशी तुलना करता भारत सर्वात बलवान वाटत असला तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कामगिरीत सातत्य ठेवले तर भारताला विजेतेपदापासून कोणीही रोखू शकणार नाही.

अर्थात, स्पर्धेतील इतर संघही जिंकण्याच्याच भावनेने मैदानात उतरणार आहेत. मुख्य म्हणजे यावेळी ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार असल्याने काहीही होऊ शकते याची जाणीव सर्वच संघांना आहे. प्रत्येक संघाला उर्वरित प्रत्येक संघाशी खेळायचे आहे. त्यानंतर सर्वोत्तम चार संघ उपांत्यफेरी खेळतील त्यामुळेच एखादा अनपेक्षित विजय किंवा पराजय स्पर्धेचे गणित बदलू शकतो. अफगाणिस्तान, बांगलादेश यांसारखे दुय्यम मानले गेलेले संघ कोणत्याही एखाद्या सामन्यात विजय मिळवून बलवान संघाला अडचणीत आणू शकतात. भारताशिवाय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या संघांकडे विजेत्यांच्या अपेक्षेने पाहिले जात असले तरी वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघही “डार्क हॉर्स’ ठरू शकतात. 1992 ची स्पर्धा अशीच राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आली होती. तेव्हा अनपेक्षितपणे पाकिस्तान विजयी झाला होता हे विसरून चालणार नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यजमान इंग्लंडला आजपर्यंत कधीही विश्‍वचषक मिळवता आलेला नाही. त्यामुळे यावेळी घरच्या मैदानावर ही स्पर्धा जिंकण्याची मनीषा ते बाळगून आहेत. दुसरीकडे मागील स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून हा चषक आपल्याकडेच ठेवण्याचे जोरदार प्रयत्न होणार आहेत. आतापर्यंत कधीही स्पर्धा न जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या गुणवान संघांकडूनही संपूर्ण ताकद लावली जाणार आहे. एकेकाळी क्रिकेटविश्‍वातील सम्राट असलेल्या वेस्ट इंडीजच्या संघालाही आपले गतवैभव परत मिळविण्याची इच्छा आहे. हा संघही गेल्या काही काळात चांगली कामगिरी करीत आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता वेस्ट इंडीज आणि भारताने दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने तब्बल पाचवेळा विजेतेपद मिळवले आहे तर पाकिस्तान, श्रीलंका यांनी आजपर्यंत एकदा एकदिवसीय क्रिकेटमधील जगज्जेतेपद पटकावलेले आहे.

या यादीत यजमान इंग्लंड कोठेच नसल्याने आणि यावेळचा इंग्लंडचा संघ अत्यंत बलवान असल्याने मायभूमीत त्यांनीच विजय मिळवावा अशीच अपेक्षा व्यक्‍त होत असल्यास त्यात गैर काही नाही; पण सर्वच संघांची तयारी आणि स्पर्धेची रचना पाहता काहीही होऊ शकते. 36 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्येच झालेल्या तिसऱ्या विश्‍वचषक स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संघाची गणना भारतासह जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांनी दुय्यम अशीच केली होती; पण पहिल्या साखळी सामन्यात भारताने त्यावेळच्या संभाव्य विजेत्या वेस्ट इंडीजला हरवले आणि नंतर चषकावर नावही कोरले. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणूनच भारताचा उल्लेख होतो. ही स्पर्धादेखील त्याला अपवाद नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपले पहिले विजेतेपद मिळवण्यात उत्सुक असलेला यजमान इंग्लंड संघ, गेल्या स्पर्धेतील विजेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेला कांगारूंचा संघ आणि गेल्या काही वर्षांत या खेळाचा खऱ्या अर्थाने लीडर बनलेल्या भारताचा संघ यांच्यामध्ये ही लढत आहे आणि ही लढत भारतानेच जिंकावी अशी रास्त अपेक्षा तमाम भारतीयांची आहे. भारताला दुसऱ्यांदा विश्‍वचषक मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी याची ही शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचे संकेतही त्याने दिले आहेत.

साहजिकच ही स्पर्धा जिंकून त्याला विजेतेपदाची भेट देण्याची दुसरी संधी मिळणार नाही. आजपर्यंतचा सर्वात बलवान आणि गुणी संघ कर्णधार विराटच्या हाताशी आहे. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखालील ही टीम इंडिया पुन्हा एकदा क्रिकेट विश्‍वचषकावर नाव कोरणार अशी अपेक्षा बाळगण्यास काहीच हरकत नाही. साखळी फेरीत पाकिस्तानला हरवण्यासाठी आणि नंतर विजेतेपदही मिळवण्यासाठी विराट आणि त्याच्या सर्व
सहकाऱ्यांना शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)