तडवी आत्महत्या प्रकरण : अन्य दोन महिला डॉक्‍टरांना अटक

तिन्ही आरोपींना 31 मेपर्यत पोलीस कोठडी

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अन्य दोन आरोपी महिला डॉक्‍टरांना अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या तीन डॉक्‍टरांपैकी भक्ती मेहेर हिला मंगळवारीच पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना देखील अटक केली आहे. या तिघींनी सातत्याने केलेली जातीवाचक शेरेबाजीच डॉ. तडवी हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

डॉ. भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सत्र न्यायालयाच्या बाहेर अटक करण्यात आली होती. तर डॉ. हेमा अहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. ही अटकेची कारवाई आग्रीपाडा पोलिसांनी केली. महिलेला रात्री अटक करणे कायदेशीर नसल्याने डॉ. हेमा अहुजाला अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती.

या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून डॉ. पायल यांना मागील वर्षभरापासून या तिघी छळत होत्या. जातीवाचक टीपण्णी करत होत्या. या तिघी कशाप्रकारे त्रास देतात हे पायलने सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे म्हणणे कुणीही ऐकून घेतले नाही. दरम्यान तिच्या आत्महत्येनंतर या तिघीही फरार होत्या.

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीसाठी नायर रूग्णालयाच्या संचालकांना नोटीस पाठविली आहे. पायल तडवीच्या मृत्यूबाबत नायर रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनाही पत्र लिहिण्यात आले होते. पायलच्या आई वडिलांनी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पायल तडवीचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच या रूग्णालयातले डॉ. सलमान यांनीही हा आरोप केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×