मोकळा श्‍वास

“तुला किती वेळा सांगितले हे असले काही घालायचे नाही? तुला ते शोभत नाही, स्वतःकडे बघतं जा आरशात, नशिब समज तुला मी आणि माझ्या घरच्यांनी पसंत केले, नाहीतर कोणी तुझ्याशी लग्न केले नसते”, असे टोमणे मारून रोजसारखाचं अमित(नमिताचा नवरा) कामावर गेला. खरेतरं आजची सकाळ ही नमितासाठी काही वेगळी नव्हती.

नमिता खरेतरं शाळा, कॉलेजमध्ये हुशार, नृत्यामध्ये पारंगत, सर्वांना समजून घेणारी, मनाने निर्मळ, आखीव रेखीव डोळे असणारे गोजिरे असे रूप. तिचा सावळा रंग वगळता तिच्या मध्ये नावे ठेवायला कोणालाही जागा सापडायची नाही. नमिताला नृत्यांगना म्हणून नाव मिळवायचे होते, पण आई मवडिलांच्या इच्छेपुढे तिने स्वतःची सर्व स्वप्न विसरून लग्नाला संमती दर्शविली. सुरुवातीला नमिताच्या स्वभावावर भाळलेला अमित नंतर नंतर मात्र तिला तिच्या रंगावरून रोज घालून पाडून बोलू लागला. अमितशी भेटल्यावर नमिताला वाटले होते की, कदाचित तिचे नृत्यांगना होण्याचे स्वप्न अमितचं पूर्ण करेल, पण नव्या नवरीचे नऊ दिवस संपले आणि नमिताचा सासूरवास सुरू झाला. सुरुवातीला सासू सासरे, बोलायचे तिला फक्त, पण नंतर अमित ही रोजचं तिला घालून पाडून बोलायला लागला. नृत्यांगना होणे दूरचं उलटं “हे असले फालतु छंद जोपासायचे नाही. हे घर आहे, तमाशाचा फड नाही”, असे म्हणून तिच्या कलेचा आणि तिचा अपमान केला जाई.

सतत मनमारून जगायचे, यामुळे नमिताची घुसमट होत होती. रोजचं हे सततचं घालूनपाडून बोलण तिच्या जिव्हारी लागायचं. तिने तिच्या आई वडिलांजवळ अमित पासून वेगळे होण्याचा विषय काढला, पण तिला समजून घ्यायचे दूरचं उलट तिलाचं समजूतीच्या चार गोष्टी सांगून तिच्या आई वडिलांनी तिची खडसावणी केली. त्यानंतर मात्र नमिता खूप खचली. रोजचं असं जगंण तिला असह्य झालं. आज सकाळी आँफिस मध्ये रागामध्ये गेलेला अमित संध्याकाळी त्याच्या मित्राला घेऊन घरी आला. खूपवेळ अमित आणि त्याचा मित्र गप्पा मारत होते, नंतर फोन आला म्हणून तो फोनवर बोलत बोलत गॅलरी मध्ये गेला, आल्यावर त्याला नमिता त्याच्या मित्रासोबत हसत खेळत बोलताना दिसली. खरेतरं अमितचा मित्र तिने केलेल्या नाष्ट्याचे कौतुक करत होता, पण अमित मात्र डोक्‍यात राग घेऊन वेगळ्याच निष्कर्षावर पोहचला. मित्र गेल्यावर मात्र अमित नमिताला खूप काही बोलला, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण करून तो निघून गेला.

रूपावरून केलेले टोमणे वगैरे ठीक होतं पण, आज अमितने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा स्वाभिमान दुखावला होता कुठेतरी म्हणूनचं आता तिला त्या घरात श्‍वास घ्यायला ही नकोसं वाटायला लागले. तिने पटकन बॅंग उचलली त्यात काही कपडे आणि तिच्या माहेरहून आलेले मोजके दागिने घेऊन ती घराच्या बाहेर पडली. कुठे जायचे, काय करायचे, हे काहीचं ठाऊक नव्हते, ती संबंध रात्र तिने बस स्टैंड वर घालवली. ईथून पुढचा रस्ता तिला ठाऊक नव्हता, पण “लोक काय म्हणतील?? समाज काय म्हणेल?”, या साऱ्याची पर्वा न करता तिने वाट धरली होती. पुन्हा मागे वळून पहायचे नाही असा तिचा निर्धार चं होता जणू. एक अनोखा आत्मविश्‍वास घेऊन नमिता निघाली होती. आता तिला कोणाचे ही बंधन नव्हते. आज खऱ्या अर्थाने ती मुक्त होती. आज कितीतरी दिवसांनी तो हरवलेला “मोकळा श्‍वास”, ती घेतं होती..!!

– ऋतुजा कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)